नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टिकास्त्र डागले आहे. काँग्रेसकडे दिग्गज वकिलांची फळी असतांनाही राहुल यांच्या प्रकरणावर स्थगिती का घेण्यात आली नाही? असा सवाल भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे राहुल गांधी यांचा बळी गेल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. (BJP vs Congress)
काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या प्रकरणात स्थगिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही.'नख कापून ते शहीद होण्याचा प्रयत्न करीत आहेत' असा आरोप देखील त्यांनी केला. हे प्रकरण रणनीतीचा भाग असून राहुल यांना बलिदानी दाखवून कर्नाटक निवडणुकीमध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांना पीडित दाखवून काँग्रेस वाचवण्याचा प्रयत्न आहे. दोषी ठरवल्यानंतर राहुल यांच्या वकिलांच्या फळीने निकालावर 'स्टे' आणण्यासाठी प्रयत्न का केले नाही? देशात सर्वांसाठी एकच कायदा असताना तुमच्यासाठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील प्रसाद यांनी उपस्थित केला.
राहुल यांच्यावर मानहानीचे ६० खटले सुरू आहेत. असे असतानाही हेतुपुरस्सर ते असे वक्तव्य करीत असतील तर ते मागासर्गीयांचा अपमान करीत आहेत, असे भाजपचे ठाम मत आहे. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात भाजप देशभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली.
राहुल गांधी यांच्यावर सूरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. असे असतानाही त्यांच्याकडे बड्या वकिलांची फौज आहे. राज्यसभा, लोकसभेत मोठे-मोठे वकील आहेत. पंरतु, राहुल यांच्या प्रकरणात ते सूरतच्या न्यायालयात का गेले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पवन खेडा यांच्या प्रकरणात मोठमोठ्या वकिलांची फौज हजर होती. मोदी असलेली सर्वात मोठी संख्या मागासवर्गातून येते. टीका करणे, शिव्या देण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही. त्यांनी समाजाला शिवी दिली आहे. त्यांचा अपमान केला आहे. राहुल यांना चुकीची गोष्ट बोलण्याचा अधिकार आहे तर मागासवर्गांना देखील न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला, असा दावा देखील प्रसाद यांनी केला.
लंडनमध्ये काही चुकीचे वक्तव्य केले नाही, असे खोटं पुन्हा राहुल गांधी बोलले. राहुल गांधी यांचे राजकारण खूप सरळ आहे. ते जिंकले तर लोकशाही योग्य, हरले तर खराब. जिंकले तर निवडणूक आयोग योग्य आणि हरले तर अयोग्य. बाजूने निर्णय आला तर न्यायालय योग्य आणि नाही आला तर न्यायालय खराब, असा आरोप प्रसाद यांनी लगावला. (BJP vs Congress)
हे ही वाचा :