Rahul Gandhi : मी गांधी आहे, माफी मागणार नाही, माझ्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi : मी गांधी आहे, माफी मागणार नाही, माझ्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : राहुल गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आणि लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर आज (दि. २५) हल्लाबोल केला. मी सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी कधीच माफी मागत नाही, असा निर्धार व्यक्त करून माझी खासदारकी रद्द करण्याची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी  पत्रकार परिषदेत केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi)  म्हणाले की, देशात लोकशाहीवर आक्रमण सुरू झाले आहे. लोकशाहीवर हल्ले होत आहेत, लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप करून माझी खासदारकी रद्द करून मला कुणीही गप्प करू शकत नाही. माझ्यावरील कारवाईमुळे मी घाबरणार नाही. मी प्रश्न विचारत राहणार. देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला धमकावून जेलमध्ये बंद करू शकतात, पण मी प्रश्न विचारणे बंद करणार नाही, मला कुणीही घाबरवू शकत नाही. मला कायमचे अपात्र केले, तरी मी माझे काम करत राहणार आहे. माझ्या पुढच्या भाषणाला घाबरून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मी सत्याच्या मार्गाने संघर्ष करणार नेता आहे. या देशाने मला प्रेम आणि सर्वकाही दिले आहे. इज्जत दिली आहे. वायनाड मतदारसंघातील नागरिकांशी माझे कुटुंबीयांसारखे नाते आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी एका चुकीच्या प्रश्नावरून पत्रकारवर संताप व्यक्त केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी देशाबद्दल कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. माझ्याविरोधात संसदेत भाजपचे मंत्री खोटे बोलले. संसदेत मला बोलू दिले जात नाही, माझी बाजू मांडू दिली नाही. माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक कुणी केली. हा अदानींचा पैसा नाही. मग हे पैसे कुणी गुंतविले. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत. याचे पुरावे मी संसदेत सादर केले आहेत. त्यांचे संबंध नवे नाहीत, जुनेच आहेत. यावर कुणीच काही बोलत नाही. हा ओबीसींची मुद्दा नाही, अदानी आणि मोदींच्या संबंधाचा मुद्दा आहे. अदानी भ्रष्ट आहेत, हे जनतेला माहीत आहे. तरीही पंतप्रधान अदानींना का वाचवत आहेत ?, असा सवाल करून अदानींच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप करून देशातील सर्व विरोधक यापुढे एकत्र येऊन काम करतील, असे गांधी म्हणाले.

 

हेही वाचा 

Back to top button