आळंदी : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतायेत, असे ऐकले तर धक्का बसेल. मात्र असे चित्र आळंदीलगतच्या धानोरे (ता. खेड ) शाळेत पाहायला मिळत असून, येथे प्रवेशासाठी मराठवाड्यासह पश्चिम भागातील विविध आमदार, खासदारांचे वशिले वापरले जात आहेत. कारण आहे शाळेची टिकवलेली गुणवत्ता व दर्जा. या शाळेने नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले असून, यामुळे 'प्राथमिक शाळेची पोरं हुशार' असे अभिमानाने म्हणावेसे वाटण्यासारखे चित्र आहे. या शाळेचे सर्व वर्गांचे प्रवेश हाऊसफुल्ल झाले आहेत.
या शाळेचे पूर्व माध्यमिक-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी व पूर्व उच्च प्राथमिक-पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 19 विद्यार्थी असे तब्बल 33 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. पाचवीचा 1 व आठवीचा 1 असे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता आठवी-14 व पाचवी-19 दोन्हीही इयत्तेत 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, खेड तालुक्यातील शाळांमध्ये अग्रभागी राहिली आहे. गुणवत्ता यादीत आठवीच्या विद्यार्थ्यांना पूनम काळे यांनी मार्गदर्शन केले, तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना अनिता परदेशी, वैशाली गावडे व सारिका काळे यांनी मार्गदर्शन केले होते.
सर्व मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचा पालकांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या पाल्याची गुणवत्ता पाहून पालकांनी एकत्र येत इयत्ता आठवीच्या 15 विद्यार्थ्यांना टायटन कंपनीची हातातील घड्याळे भेट दिली आहेत. पाठीवर कौतुकाची थाप आणि हातात मस्त घड्याळ घालून मुलांचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसून येत होता. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख निवृत्ती जगताप, धानोरे शाळेचे आदर्श मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, सर्व शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीतच आयएसओ मानांकन प्राप्त शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून पालकांचा ओढा असणे साहजिकच असून, अशाच शाळेप्रमाणे इतर परिसरातील शाळांनी गुणवत्ता व दर्जा राखावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
हेही वाचा :