पुणे : ओला, उबेरची टॅक्सी, रिक्षा कुठे आली आहे? ती किती वेळात येणार आहे? जवळपास कोणती गाडी उपलब्ध आहे ? अशी माहिती अॅपद्वारे प्रवाशांना मिळते. तशीच माहिती पुणेकरांना आता पीएमपीच्या बस गाड्यांची देखील मिळणार आहे. म्हणजेच पुणेकरांना 'क्यूआर कोड' च्या सुविधेनंतर पीएमपीच्या बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. यामुळे पुणेकरांना थांब्यांवर तासन्तास बसची वाट पाहावी लागणार नाही.
पीएमपीकडून येत्या तीन महिन्यांच्या आत लाइव्ह लोकेशन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर कार्यवाही सुरू असून, तीन महिन्यांच्या आत 900 ते 1200 बस गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे पीएमपीच्या प्रवाशांना तासन्तास बस थांब्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागणार नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी पीएमपीमध्ये नियुक्त झालेल्या अनेक अध्यक्षांनी आणि सह व्यवस्थापकीय संचालकांनी प्रयत्न केले होते. मात्र, ही सेवा सुरू करण्यात त्यांना यश आले नाही. परंतु, आता नुकतीच क्युआर कोड सेवा सुरू करण्यात यशस्वी झालेले अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांना लाइव्ह लोकेशन सिस्टीम ही विनाअडथळा सुरू करण्यात यश मिळणार का? हे आता पाहावे लागणार आहे.
प्रवासी संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत आहोत. बसमधून प्रवास करून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. त्या वेळी अनेक प्रवाशांनी कॅशलेस पेमेंटद्वारे तिकीट मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू केली आहे, आता पुढील तीन महिन्यांच्या आत नऊशे ते बाराशे बसमध्ये लाइव्ह लोकेशन सेवा सुरू करणार आहोत.
– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
अशी आहे स्थिती
पीएमपीची
प्रवासी संख्या :
दररोज – 13,70,213
मासिक – 3,74,27,633
वार्षिक – 40,06,80,195
संचलन बस संख्या
नियोजित बस संख्या – 2080
प्रत्यक्ष बस संख्या – 1754
एकूण मार्ग – 381
शहर आगारांची संख्या- 15
दिवसभरातील फेर्या :
नियोजित फेर्या -19,931
प्रत्यक्ष फेर्या – 20,043
हेही वाचा :