पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेवर दाखल असलेला गुन्हा समोर आला आहे. या गुन्ह्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत होणार असल्याचे दिसत असून पुणे पोलिसही तपासाठी ताबा घेण्याची शक्यता आहे.
सातारचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी 'अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही,' असे बोलून ऐन मराठा आरक्षणाच्या काळात खळबळ उडवून देणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत असून याप्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी नुकताच गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपासासाठी त्यांचा ताबा पुणे पोलिस घेण्याची शक्यता आहे.
सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांचा केव्हाही ताबा पुणे पोलिस घेऊ शकतात. त्यामुळे अॅड. सदावर्तेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्यावर सातारा, पुणे, नाशिक, अकोला, कोल्हापूर आदी ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
हे ही वाचलं का ?