पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या ईलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या बसचालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूकीवर परिणाम झाला असून, प्रवाशांचे हाल झाले.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्यातील काही ठेकेदारांच्या भाडेतत्वावरील तर काही स्व:मालकीच्या आहेत. सुमारे 4 हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. 2 हजार चालक पीएमपीचे स्वत:चे तर 2 हजार ठेकेदारांचे आहेत. यातीलच ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील 200 चालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूकीवर सकाळी काही प्रमाणात परिणाम झाला. परिणामी, बसेसची वारंवारिता कमी झाली. मात्र, प्रशासनाकडून चालकांचे नियोजन करण्यात आले असून शुक्रवारी मार्गावर 1635 बस उतरविण्यात आल्या. पीएमपी अध्यक्षांनी नुकत्याच जास्तीत जास्त बस मार्गावर उतरवल्या होत्या. सुमारे 1700 ते 1750 गाड्या दररोज मार्गावर असतात. परंतु, शुक्रवारी मार्गावरील बसची संख्या काही प्रमाणात कमी झाली.
आम्ही शहरात राहतो, शहरात महागाई भरपूर आहे. किमान 750 ते 900 रूपयांपर्यंत आम्हाला रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार आम्हाला फक्त 530 रूपये रोज देत आहे. इतक्या कमी पगारात आम्ही घर कसे चालवणार. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या संपावर गेलेल्या चालकांकडून करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत हा संप सुरू असून, पगाराच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही.
पीएमपीच्या काही खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी विशेषतः इलेक्ट्रिक बस ठेकेदारांकडील चालकांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला आहे. खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पीएमपीकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल सुरु ठेवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्यात आले.
– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल
हेही वाचा: