Latest

आषाढी वारीसाठी मंदिरात कंट्रोल रुम; अतिरिक्ति आयुक्त विकास ढाकणेंची माहिती

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

यंदाची आषाढीवारी बॅनरमुक्त, प्लास्टिकमुक्त व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. वारकर्‍यांच्या सेवेसाठी व आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या आकुर्डीतील विठ्ठल मंदिराच्या मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोल रूमची उभारण्यात येणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी फिरत्या कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

पालखी सोहळ्यासाठी पालिकेच्या सर्व संबंधित विभाग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, आळंदी नगरपरिषद व देहू नगरपंचायत, पोलिस प्रशासन आदी विभागांचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व आस्थापनांच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत ढाकणे बोलत होते.

ढाकणे यांनी सांगितले की, आवश्यकतेनुसार ड्रोन कॅमेर्‍याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व आस्थापनांना अंतर्गत जलद संपर्क साधता यावा याकरिता वॉकीटॉकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर प्रत्येक 200 मीटर अंतरावर अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर फिरती शौचालये तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व बर्निंग मशिन ठेवण्यात येणार आहेत.

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, सतीश इंगळे, उपायुक्त संदीप खोत, विठ्ठल जोशी, सचिन ढोले, किरण गावडे, मेजर उदय जरांडे, ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा तसेच, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, देहूरोड बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल दबडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश यादवाडे आदी उपस्थित होते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट, पोलिसांना सहकार्याची अपेक्षा

पोलिस विभाग व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्‍यांना पालखी नियोजनासंबंधी महापालिकेने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुक्कामाच्या ठिकाणी व शहरात पालखीमार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने मनुष्यबळासह यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक संख्येनुसार टँकर उपलब्ध करून द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती पालिकेच्या वतीने केली जावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT