पुढारी ऑनलाईन डेस्क: हरियाणामध्ये विषारी दारू पिल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. संबंधित घटना हरियाणातील यमुनानगर आणि अंबाला जिल्हयात घडल्या आहेत. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (Poisonous Liquor Death)
अंबाला आणि यमुनानगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यमुनानगरमध्ये शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाल्याची समोर आले हाेते. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिमाद्री कौशिक म्हणाल्या, विषारी दारू पिल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आम्ही विविध गावांमध्ये जाऊन लोकांना अशी दारू पिऊ नये, अशी विनंती करत आहोत. या घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे देखील पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Poisonous Liquor Death)
पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून, इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. जीवाच्या भीतीने गावकरी या दारू व्यावसायिकांविरुद्ध उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. आम्ही आवाज उठवला तर आमचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती एका ग्रामस्थाने व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील दोन स्थलांतरित मजुरांचा गुरुवारी (दि.९) अंबाला येथे संशयास्पदरित्या बनावट दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.