

नगर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर जेलमधून पळालेल्या कैद्यांना साथीदार कैद्याच्या मदतीने नेपाळ गाठायचे होते. पण मोटारकार बंद पडल्याने त्यांनी प्रवासी मोटारीने प्रवास केला. जामनेर येथे एका टपरीवर भजे खालले. पैसे नसल्याने हॉटेल चालकाच्या खात्यावर पैसे मागविले अन् तिथंच घात झाला. सहा जण अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, सहा मोबाईल व मोटार कार असा दहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
राहुल देविदास काळे, रोशन उर्फ थापा रमेश ददेल, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले अशी पळालेल्या कैद्यांची नावे होती. तर, त्यांना मदत करणारे मोटारकार चालक मोहनलाल नेताजी भाटी (रा. वडगांव शेरी, जि. पुणे), अल्ताफ आसिफ शेख (रा. कुरण ता. संगमनेर) अशा मदत करणार्या दोघांना ही पोलिसांनी अटक केली. वरील सहा जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गट रचने, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, जेल तोडून पळून जाणे या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की वरील कैदी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उपकारागृहाच्या मराठीचे गज तोडून पळाले होते. घटना घडल्यानंतर लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक शोधासाठी रावना झाले. कारागृहाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जेल तोडून पळालेले पांढर्या रंगाच्या मोटरीतून पळाले असल्याची माहिती बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने संगमनेर शहरातील 40 ते 50 सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन मोटारीचे चालक व मालक यांची नावे निष्पन्न केली.
तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचे वाहन हे धुळे येथून शिर्डीकडे येत असल्याचे लक्षात येताच त्यावरील चालक मोहनलाल भाटी यास शिर्डी येथून गुन्ह्याचे वेळी वापरलेले वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता तो लॉकअपमधून पळून गेलेले वरील कैदी व त्यांना मदत करणारा अल्ताफ आसिफ शेख जेलमधून पळाल्यानंतर धुळे येथे शांतिसागर हॉटेल येथे थांबले होते. मोटारकार नादुरुस्त झाल्याने वरील पाचही जण प्रवासी वाहनातून जळगावच्या दिशेने निघाले. पुढे ते नेपाळला जाणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलीस पथकाने तात्काळ जळगावच्या दिशेने धाव घेत जामनेर परिसरातील शांतीसागर हॉटेल व आजुबाजुचे हॉटेल, दुकानदार यांना आरोपीचे फोटो दाखवून विचारपूस केली.
एका चहाच्या टपरीवर कैद्यांनी भजे व चहा घेतल्याचेही तपासात समोर आले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने टपरी चालकाच्या फोनवरून एकाला फोन करून दोन हजार रुपये मागून घेतले व उर्वरित पैसे टपरी चालत आपण घेतले. या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन संबंधित व्यक्तीकडे विचारपूस करता त्याने वरील आरोपी हे त्याचे शेतामध्ये थांबले असल्याची माहिती दिली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शेतामध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला असता 5 आरोपी ओढ्यामध्ये आंघोळ करीत असताना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल जिवंत काढतोस हा मोबाईल व एक मोटार कार असा दहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास कामी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश, सहयक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी दत्ता हिंगडे, बापुसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.
पो.नि. करे चौकशी अधिकारी
संगमनेरच्या कारागृहातून चार कैदी पळून गेले. यावेळी उपकारागृहात तीन पोलीस कर्मचारी व एका होमगार्ड यांच्याकडे बंदोबस्ताची जबाबदारी होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तीनही कर्मचार्यांना निलंबित केले आहे. आता या प्रकरणाची चौकशी अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
एक महिन्यापासून कापत होते गज
वरील चारही कैदी कारागृहात असताना थापा नावाचा कैदी गेल्या एक महिन्यापासून त्याचा ब्लेडने बराकीचे गज कापत होता. कारागृहात गज कापण्यासाठी हेक्सा ब्लेड आले कसे, ते कोणी पुरविले याबाबत शोध सुरू असून संबंधितांनाही काही दिवसांत अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
बाहेरच्या लोकांशी संपर्क कसा?
पळालेले कैदी व अल्ताफ शेख काही दिवस कारागरात एकत्र होते. त्यामुळे त्यांची मैत्री होती. अल्ताफ शेख यांनीच पळून जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. मग अल्ताफ शेख आणि कारागरातील कैदी यांचा कसा संपर्क झाला. त्यांना कोण माहिती पूर्वीच होते. या संदर्भात सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात.