नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी (PM's security breach) आढळल्याचे बुधवारी पंजाबमधील एका घटनेने स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांची फिरोजपूर येथील नियोजित जाहीर सभा रद्द करण्याचा प्रसंग बुधवारी ओढविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा धोक्यात आल्याचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली असून सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारची चूक स्वीकारली जाऊ शकत नाही, असे सांगतानाच दोषी लोकांवर कठोर कारवाई करावी आणि पंजाब सरकारला आवश्यक ते निर्देश दिले जावेत, अशी विनंती अॅड. सिंग यांनी याचिकेत केली आहे.
पंजाबातील शेतकरी संघटनांशी संबंधित निदर्शकांनी पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा अडविला होता. त्यानंतरही पंजाब पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर अर्धा तास खोळंबला. या प्रकारावर पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे या गंभीर प्रकाराबद्दल खुलासा मागितला आहे.
दिल्लीला परतण्यासाठी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतरही मोदींचा संयम मात्र सुटला नाही. ते अधिकार्यांना उद्देशून म्हणाले, 'मी विमानतळापर्यंत जिवंत पोहोचलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझ्याकडून धन्यवाद सांगा!'
सभा रद्द करण्यामागे सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे त्याबद्दल अहवाल मागितला आहे. पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षेत बेजबाबदारपणा समोर आला आहे. पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर 20 मिनिटांपर्यंत अडविला गेला, यादरम्यान अप्रिय घटना घडू शकली असती, याबद्दल गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधानांची सभा रद्द होण्यामागे काँग्रेसचे कटकारस्थान आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे, शेतकर्यांचा विरोध आणि मोदींबद्दल पंजाबातील जनतेला असलेला राग ही सभा रद्द होण्यामागचे मुख्य कारण आहे, असा दावा राज्यातील शेतकरी संघटनांनी केला आहे.
पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांनी पंतप्रधानांच्या वाहनांचा मार्ग सुरक्षित असल्याचा विश्वास आधी दिला होता. नंतर मग निदर्शकांना पंतप्रधानांच्या नियोजित मार्गात शिरण्याची परवानगी दिली कशी, असा सवाल भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला आहे. नंतर मार्ग निघावा म्हणून फोन केला असता मुख्यमंत्री चन्नी यांनी तो घेतलाच नाही, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान भटिंड्याला उतरल्यानंतर खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरने पुढे जाणे अशक्य झाले. त्यांनी 20 मिनिटे वाट पाहिली. त्यानंतर मोटारीने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते आपल्या ताफ्यासह राष्ट्रीय शहीद स्मारकावर गेले. त्यांना प्रवासाला दोन तास लागणार होते. पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांचा मार्ग सुरक्षित असल्याचे आश्वस्त केले. त्यानंतर मोदींचा ताफा पुढे निघाला. हुसैनीवालातील शहीद स्मारकाला 30 किलोमीटर उरलेले असताना ताफा एका फ्लायओव्हरवर पोहोचला. निदर्शकांनी तेथे रस्ता अडवून ठेवला होता. मोदी तेथे 15-20 मिनिटे अडकून पडले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी चूक आहे, असा ठपका केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारवर ठेवला आहे.
हे ही वाचा :