YCM Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

YCM Hospital Medicine Shortage: वायसीएम रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदीची वेळ

औषध वितरण केंद्रात आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या; साठ्याची तपासणी करून तातडीने औषध उपलब्ध करून देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली आवश्यक औषधे रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्रात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना खासगी औषध विक्रेत्यांकडून महागड्या दराने ती औषधे खरेदी करावी लागत आहेत. औषधांची ही कमतरता तातडीने दूर करून रुग्णांना सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

वायसीएम रुग्णालयात शहरासह आसपासच्या परिसरातील हजारो सर्वसामान्य, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे वितरण केंद्रात मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषध विक्रेत्यांकडून महागड्या दराने ती खरेदी करावी लागतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या उपचारांमध्ये खंड पडून आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये किंवा रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत.

महापालिकेकडून आरोग्यसेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जात असतानाही रुग्णालयात अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसणे चिंताजनक आहे. डॉक्टरांनी औषध सूचीतील औषधे लिहून दिल्यानंतरही ती वितरण केंद्रात मिळत नसतील, तर औषधांची खरेदी, साठवणूक व वितरण प्रक्रियेची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

औषधसाठ्याची तातडीने तपासणी करा

वायसीएम रुग्णालयातील उपलब्ध व नसलेल्या औषधांच्या साठ्याची तातडीने तपासणी करावी. दैनंदिन उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांची आपत्कालीन पद्धतीने खरेदी करून ती रुग्णांना रुग्णालयातूनच विनामूल्य द्यावीत. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, बालरोग व अन्य गंभीर आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा, अशा मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करावा

वायसीएम रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्राबाहेर उपलब्ध व उपलब्ध नसलेल्या औषधांची यादी दररोज प्रसिद्ध करावी. औषधांच्या कमतरतेस जबाबदार असलेले अधिकारी, पुरवठादार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. औषधांबाबत रुग्णांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र मदत व तक्रार निवारण कक्ष सुरू करावा. औषध खरेदी व वितरण व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT