YCM Hospital Ambulance Incident Pudhari
पिंपरी चिंचवड

YCM Hospital Ambulance Incident: वायसीएमच्या धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर!

पिंपरीत धक्कादायक प्रकार; दरवाजा लॉक न केल्याचा संशय, चालकाला नोटीस देऊन खुलासा मागवला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण थेट रस्त्यावर पडल्याची घटना शनिवार (दि.१०) रोजी घडली असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या आवारातच घडला. मिळालेल्या माहितीनुसार, वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन जात असताना मागचा दरवाजा आपोआप उघडला आणि रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला. रुग्णवाहिकेमध्ये त्या वेळी पुढे पोलिस कर्मचारीदेखील बसले होते. हा रुग्ण अज्ञात व्यक्ती असल्याने त्याच्याबरोबर मागच्या बाजूला कोणीही नातेवाईक नव्हते. सुदैवाने मागे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये नागरिक रुग्णवाहिका चालकाला जाब विचारताना दिसत आहेत. रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित लॉक केला होता का, सोबत डॉक्टर किंवा कर्मचारी का नव्हते, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. रुग्णाची प्रकृती नेमकी कशी आहे, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. अशा मोठ्या रुग्णालयात रुग्णाच्या सुरक्षेबाबतच असा हलगर्जीपणा होत असेल तर सर्वसामान्य रुग्णांनी जायचे कुठे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रुग्णवाहिकेचे दरवाजे, स्ट्रेचर व्यवस्थित लॉक होते का? आणि रुग्णासोबत वैद्यकीय कर्मचारी का नव्हता? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस आणि महापालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित रुग्णाला वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा लॉक झालेला नसेल. दरवाजा बंद करण्यात चालकाचे दुर्लक्ष झाले असेल. रुग्णवाहिकेच्या चालकास आम्ही नोटीस दिली आहे. त्याचा खुलासा आल्यानंतर योग्य ती माहिती कळेल.
डॉ. अभयचंद्र दादेवार (अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी)
वायसीएम रुग्णालयाच्या धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना अत्यंत संतापजनक आहे. महापालिकेची वर्षे वाढली, पण आरोग्यसेवेचा दर्जा आणि रुग्णांची सुरक्षितता वाढली का? रस्ते, इमारती आणि जाहिराती म्हणजेच विकास नव्हे; तर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे, हाच खऱ्या विकासाचा निकष आहे. महापालिका आयुक्तांनी या घटनेची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. केवळ चौकशीचे आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे.
दीपक खैरनार (माहिती अधिकार कार्यकर्ता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT