पिंपळे गुरव : वल्लभनगर येथील यशवंतराव स्मृती रुग्णालयात शनिवारी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण ओपीडी व टोकन व्यवस्था कोलमडून पडली. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना अक्षरशः तासभर रांगेमध्ये उभे राहवे लागले. केसपेपर मिळत नसल्याने टोकन व्यवस्था पूर्णतः बंद झाली आणि रुग्णसेवा जवळजवळ ठप्प झाली."
शनिवारी ओपीडीची वेळ सकाळी अकरा वाजेपर्यंत असते. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईक उपचारासाठी रुग्णालयात आले होते. मात्र, सर्व्हर बंद असल्याचे समजताच रुग्णांमध्ये अस्वस्थता पसरली. संगणकावर रुग्णांची माहितीच उपलब्ध होत नसल्याने केसपेपर देणे शक्य नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परिणामी रुग्णांना सर्व्हर कधी सुरू होईल, या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने प्रतीक्षेतच वेळ घालवावा लागला.
टोकन निघत नसल्याने डॉक्टरांच्या ओपीडीसमोर शुकशुकाटाचे वातावरण होते. संगणकीय नोंदीशिवाय रुग्ण तपासणी शक्य नसल्यामुळे अनेक डॉक्टरांनीही तपासणी सुरू केली नाही. बाहेर रुग्ण व नातेवाईकांची गर्दी आत ओपीडी कक्ष रिकामे अशी विसंगत स्थिती रुग्णालयात पाहायला मिळाली. गंभीर आजाराचे रुग्ण, वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला तसेच लहान मुलांसह आलेल्या पालकांना या गोंधळाचा मोठा फटका बसला.
इतर दिवशी जवळजवळ मोकळी असणारी टोकन खिडकी सर्व्हर बंद असल्याने गर्दीने फुलून गेली. संतप्त रुग्ण व नातेवाईक कर्मचारी वर्गाकडे वारंवार विचारणा करत होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस माहिती किंवा पर्यायी व्यवस्था न दिल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत गेली. सर्व्हर आता सुरू होईल, थोड्या वेळात सुरू होईल, अशी आश्वासने दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात सर्व्हर सुरू न झाल्याने अनेक रुग्ण उपचाराविना परतले.=
एकीकडे संगणकीकरणाच्या नावाखाली संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे सर्व्हर बंद पडताच संपूर्ण रुग्णालय ठप्प होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पर्यायी यंत्रणा मॅन्युअल नोंदणी किंवा तात्पुरती व्यवस्था न ठेवणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे स्पष्ट उदाहरण असल्याची टीका रुग्णांकडून होत आहे.
सकाळपासून रांगेत उभा आहे. पाय दुखत आहेत, चक्कर येत आहे; परंतु सर्व्हर बंद आहे म्हणून तपासणीच होत नाही. सगळे डिजिटल केले पण सर्व्हर गेला की रुग्णालयच बंद पडते. पर्यायी व्यवस्था का नाही?ज्येष्ठ नागरिक, रुग्ण.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णसेवा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असताना तांत्रिक बिघाडामुळे रुग्णांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्व्हर बिघाडाच्या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना, बॅकअप सिस्टम व जबाबदार अधिकाऱ्यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सर्व्हर डाऊन असल्याबाबतची सद्यस्थिती तपासून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. काम कुठपर्यंत पूर्ण झाले आहे याची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.अभयचंद्र दादेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय.