नवलाख उंबरे: हिवाळ्याची सुरुवात होताच शहरासह ग््राामीण भागातील व्यायामशाळांमध्ये सदस्यत्वासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसू लागली आहे. तापमानात झालेली घसरण, पहाटेच्या वेळची गार हवा आणि शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी होणारी कसरत ही अनेकांना थेट जिमकडे आकृष्ट करत आहे. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या फिटनेस सीझनला यंदा विशेष जोर मिळत असून, अनेक जिममध्ये मेंबरशिप नोंदणीचा आकडा गेल्या वर्षांच्या तुलनेत 25 ते 40 टक्क्यांनी वाढला असल्याचे समोर आले आहे.
गर्दीमुळे अतिरिक्त प्रशिक्षकांची नेमणूक
अनेक जिममध्ये हिवाळ्यानिमित्त खास ऑफर्स, मेंबरशिप सवलती, विंटर फिटनेस चॅलेंज, कॅलरी बर्न कॅम्प, डाएट प्लॅनिंग अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. काही व्यायामशाळांनी तर सकाळ-संध्याकाळच्या बॅचेसमधील वाढत्या गर्दीमुळे अतिरिक्त प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. जिम मालकांच्या सांगितले, की यंदा तरुण वर्गामध्ये फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक शिस्तबद्ध झाला आहे. सोशल मीडियावरील रील्स, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स आणि न्यू ईयर रिझोल्यूशनमुळे जिमकडे ओढा आणखी वाढला आहे.
योगा शिबिराला प्रतिसाद
विशेष म्हणजे, महिलांमध्येही फिटनेसविषयीची जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. योगा, झुंबा, एरोबिक्स, स्ट्रेचिंग क्लासेस यांना प्रतिसाद वाढत असून, अनेक महिलांनी स्वतःसाठी स्वतंत्र ट्रेनिंग शेड्यूल आखले आहे. काही ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू करण्यात आल्यामुळे त्यांची उपस्थिती आणखी वाढली आहे. एकंदरीत, हिवाळ्याच्या आगमनाने फिटनेसच्या दिशेने सर्व वयोगटाकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरात फिटनेस मोहीमच सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. व्यायामशाळांत सुरू असलेली ही वाढती गर्दी आगामी महिन्यांत वाढण्याची चिन्हे आधीपासूनच दिसू लागली आहेत.
हिवाळ्यात शरीरातील मेटाबॉलिझम जलद गतीने कार्य करतो, ज्यामुळे व्यायामाचा परिणाम अधिक वेगाने जाणवतो. त्यामुळे वजन कमी करणे, स्नायू बळकट करणे किंवा स्टॅमिना वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा ऋतू अतिशय फायदेशीर ठरतो. याच कारणामुळे कार्डिओ वर्कआऊट, वेट ट्रेनिंग, क्रॉसफिट, फंक्शनल ट्रेनिंग अशा विभागांमध्ये नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.राकेश शिंदे, व्यायामशाळा प्रशिक्षक
हिवाळ्यात सर्दी, खोकला व थकवा यांसारख्या तक्रारी वाढतात. अशावेळी योग्य व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार हे शरीराचे रक्षण करणारे महत्त्वाचे घटक ठरतात. तसेच, व्यायामापूर्वी पुरेसा वॉर्म-अप, योग्य पाणी पिणे, ओव्हरलोड न करणे योग्य असते.डॉ. शरद पाटील