पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिक अद्याप ओला व सुका कचरा वेगळा करीत नाहीत. ओला व सुका कचरा एकत्रित दिला जात आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिक, हाऊसिंग सोसायटी व आस्थापनांना करण्यात आले आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)
घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच, व्यावसायिक कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिकेने कचरा विलगीकरणासाठी हाऊसिंग सोसायट्यांना दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण होईल. या प्रक्रियेमुळे पुढील टप्प्यांमध्ये कंपोस्टिंग, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती सुलभ होईल. नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने यासाठी स्वतंत्र निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. ही पथके दररोज कचरा संकलना वेळी विलगीकरणाची तपासणी करतात. विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर, हाऊसिंग सोसायट्यांवर किंवा व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
ओला कचरा : भाजीपाल्याच्या साली, अन्नाचे उरलेले तुकडे, फुलांचा कचरा, बागेतील पाने व अन्य जैविक कचरा
सुका कचरा : प्लास्टिक, कागद, धातू, बाटल्या, पॅकेजिंग साहित्य, थर्माकोल व इतर पुनर्वापरयोग्य वस्तू
घरगुती घातक कचरा : ट्यूबलाईट, बॅटऱ्या, बल्ब, तुटलेल्या धारदार वस्तू, ब्लेड, केमिकल्स, पेन्ट, इंजेक्शन, जैववैद्यकीय कचरा
सॅनिटरी कचरा : सॅनिटरी पॅड्स, डायपर्स, बँडेजेस.
ई-कचरा : खराब संगणक, लॅपटॉप, सीपीयू, टेलिव्हिजन संच, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू.
पिंपरी-चिंचवड स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा वर्गीकरणाचे नियम पाळून सहकार्य करावे. जेणेकरून शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक होईल. ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करून तो घंडागाडी चालकास द्यावा, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.