Nagar Panchayat Election Pudhari
पिंपरी चिंचवड

Wadgaon Nagar Panchayat Election: वडगाव नगरपंचायत निवडणुकीत तब्बल 50 कोटींचा चुराडा; ‘पर्चेस वोटिंग’चा नवा फंडा

‘हक्काचं मत’ ताब्यात ठेवण्यासाठी भावकीतच पैशांची बरसात; एका मतासाठी 15 हजारांपर्यंत दर, मतदारांची झाली दिवाळी!

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या हक्कांच्या मतांसाठी अक्षरशः पैशांचा पाऊस झाला असून, या निवडणुकीत तब्बल 50 कोटींचा चुराडा झाला असल्याची चर्चा रंगली आहे.

अलीकडच्या काळात कुठलीही निवडणूक आली की, पैशांची उलाढाल हे समीकरणच झाले असले तरी वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मात्र पैशांचा पाऊस पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरल्यापासून मतदान होईपर्यंत फक्त मतदान खरेदीचाच प्रयत्न इच्छुकांकडून केला जात होता. यापूर्वी निवडणूक जिंकण्याच्यादृष्टीने मतांचा आकडा गाठण्यासाठी हक्काची मते गृहीत धरून उरलेल्या स्थलांतरीत मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात होते; परंतु या निवडणुकीत मात्र सर्वप्रथम हक्कांची मतेच ताब्यात ठेवण्यासाठी पैशाचा बाजार झाल्याचे पहावयास मिळाले.

अनेक ठिकाणी भावकीतच लढत

याचे प्रमुख कारण म्हणजे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या बहुतांश जागांवर भावकी भावकी तर काही ठिकाणी दोन भावकीत प्रतिष्ठेची लढत होती. तसेच प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होती. तर, काही ठिकाणी पक्षांमुळे तिरंगी लढत होती. त्यामुळे पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली.

10 ते 15 हजारांपर्यंत वाटप

आपल्या हक्काचे मतदार प्रतिस्पर्धी उमेदवाराने वश करू नये, यासाठी प्रत्येक उमेदवाराने हक्काच्या मतदारांना प्रथम ताब्यात ठेवण्यासाठी पैसे वाटप सुरू केले. यामध्ये काही उमेदवारांनी तर स्वतःच्या भावकीतील मतदारांनाही पैसे वाटप केल्याची चर्चा आहे. काही प्रभागांमध्ये मताला 15 हजार तर काही प्रभागांमध्ये मताला 10 हजार रुपये वाटप झाले. तर, काही ठिकाणी 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत वाटप करण्यात आल्याची चर्चा असून, बहुसंख्य मतदारांनी सर्वच उमेदवारांकडून पैसे घेतल्याने एका कुटूंबात कमीत कमी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत रक्कम पोहोचल्याची चर्चा आहे.

पैसे वाटपावर विजयाचे गणित

दरम्यान, निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी असल्याने आता मतांच्या आकडेवारीवरून निकालाचा अंदाज लावण्याची चढाओढ सगळीकडे सुरू आहे. यामध्येही विशेषतः पर्चेस मतांचाच गांभीर्याने विचार केला जात आहे. कोणी किती मते खरेदी केली त्यावरच विजयाचे गणित सध्या सुरू असल्याची चर्चा आहे.

या प्रभागांमध्ये मोठी उलाढाल !

शहरातील प्रामुख्याने प्रभाग 4, 10, 11, 12, 13, 16, 17 या प्रभागांमध्ये जवळपास 15 हजार रुपयांचा भाव मिळाल्याने या प्रभागांमध्ये पैशांची मोठी उलाढाल झाल्याचे समजते. त्या खालोखाल प्रभाग 2, 3, 5, 6, 7, 15 या प्रभागांमध्ये मताला साधारणतः 10 हजार रुपये दिले गेल्याची चर्चा आहे.

सर्वसामान्य मतदारांची झाली दिवाळी !

दरम्यान, पैसे घेऊन मत देणे हे चुकीचे असले तरी पैसे देऊन मत घेणे हे उमेदवारांच्यादृष्टीने महत्त्वाचे झाल्याने उमेदवारांनी कुठलीही कसर न करता प्रभागातील 60 ते 70 टक्के मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकही उमेदवार मागे राहिला नाही. त्यामुळे मतदारांना सर्वच उमेदवारांकडून पैसे मिळाल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मतदारांची मात्र पुन्हा एकदा दिवाळी झाली आहे.

न भूतो न भविष्यती ठरली वडगावची निवडणूक

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरात यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीतील समीकरणे आणि या निवडणुुकीत वापरले गेलेले समीकरण यामध्ये खूप फरक आहे. लोणावळा, तळेगाव दाभाडे येथील निवडणुकांपेक्षा मोठी उलाढाल वडगावात झाली याचीच चर्चा सगळीकडे आहे. अशी निवडणूक यापूर्वी कधी पाहिली नाही आणि यापुढे अशी निवडणूक लढण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे मत शहरातील जाणकार व ज्येष्ठ मंडळी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT