वडगाव मावळ: पर्चेस व्होटिंगचा फंडा ठरलेल्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली असली तरी पक्षाच्या मातब्बर पदाधिकाऱ्यांचा पराभव मात्र जिव्हारी लागला आहे. तर, दुसरीकडे काटे की टक्कर देऊनही केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागल्याने भाजपलाही चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे पर्चेस व्होटिंग हा एकमेव फंडा ठरलेल्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत हा फंडाही काही मतदारांच्या दृष्टीने चुकीचा ठरला आहे.
वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक असून, दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निवडणूक झाल्याने भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी मोठी चढाओढ झाली होती. या निवडणुकीत दोन-तीन प्रभाग वगळता नगराध्यक्ष पदासह जवळपास सर्व प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने गेली तीन चार वर्षे निवडणुकीची तयारी करणाऱ्या माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांना उमेदवारी दिली होती. तर, भाजपने अनपेक्षितपणे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची मुलगी मृणाल म्हाळसकर यांना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले होते.
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या चुरशीच्या लढतीनंतर भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना विजयाची खात्री वाटत होती. तसेच, आमचे दहा नगरसेवक निवडून येणार व आमचीच सत्ता येणार असाही दावा दोन्ही पक्षांकडून केला जात होता. असे असताना निवडणूक निकालाने मात्र सगळे दावे फेटाळून लावले. साधारणतः पाचशेच्या आत मताधिक्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी होईल असे वाटत असताना राष्ट्रवादीच्या अबोली ढोरे हा 1460 मतांनी विजयी झाल्या. तसेच, नगरसेवक पदाच्या एकूण 17 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली. तर, भाजपला 6 जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. त्यामुळे नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे अंदाजही फोल ठरले.
राष्ट्रवादीच्या मातब्बरांना धक्का
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, माजी शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी युवक अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, माजी महिलाध्यक्षा मीनाक्षी ढोरे, महिला कार्याध्यक्षा वैशाली ढोरे अशा मातब्बर उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाची एकहाती सत्ता आली असली तरी मातब्बरांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळाचे गणितही फसले आहे.
भाजपचा अंदाज फसला
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा तरुण उमेदवार देऊन तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या भाजपला नगराध्यक्ष पद व सत्तेचे खात्री होती. त्यानुसार त्यांनी काटे की टक्करही दिली होती, परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. तसेच, प्रभाग 4 मध्ये युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अतिश ढोरे यांच्या पत्नी पूजा ढोरे यांचा अवघ्या एका मताने झालेला पराभव तसेच, माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, माजी नगरसेविका दीपाली मोरे यांचा पराभव झाल्याने भाजपचा सत्तेचा अंदाज फसला.