Visapur Fort Cannonball Pudhari
पिंपरी चिंचवड

Visapur Fort Cannonball: विसापूर किल्ल्यावर जमिनीत गाडलेला ऐतिहासिक तोफगोळा सापडला; पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द

पाच किलोपेक्षा अधिक वजनाचा ‘कुल्फी’ प्रकारातील तोफगोळा; २०१८ पासून आतापर्यंत सात तोफगोळे आढळले, गडावर शास्त्रोक्त उत्खननाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: गडभ्रमंती करत असताना गडावरील दारूगोळा कोठाराजवळ पर्यटकांना जमिनीतून थोडासा वर आलेला तोफगोळा नजरेस पडला. त्यानंतर सहजपणे खोदून तो तोफगोळा बाहेर काढण्यात आला व पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

विसापूर किल्ल्यावर दारूगोळा कोठाराजवळ मंचाचे कार्याध्यक्ष सागर कुंभार यांच्या नजरेस तोफगोळा पडला. यानंतर त्यांनी याची माहिती पुरातत्व विभागाला दिली. तसेच, या विभागाचे कर्मचारी सुभाष दहिभाते, मच्छिंद्र वाघमारे, रोहित नगीने, हेमंत वाघमारे यांच्याकडे हा तोफगोळा सुपूर्द करण्यात आला आहे.

गडावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खननाची मागणी

याबाबतीत मंचातर्फे वेळोवेळी पुरातत्व विभागाला आवाहन करण्यात आले आहे. गडावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन केले तर इतिहासाच्या दडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी प्रकाश झोतात येतील. तसेच, गडावरील अनेक राजवाडे, जलकुंड व इतर वास्तू भग्नावस्थेत पडलेले आहेत. याचीही देखभाल होणे गरजेचे आहे.

यापूर्वी तीनवेळा सापडले होते तोफगोळे

याप्रसंगी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे म्हणाले, की मंचाच्या कार्यकर्त्यांना २०१८ मध्ये तीन, २०१९ मध्ये दोन, २०२४ मध्ये एक व यावर्षी पुन्हा एक तोफगोळा सापडला आहे. हे सर्व तोफगोळे एकाच परिसरात मिळून येत आहेत. तेवढ्याच परिसरात जर उत्खनन केले तर बरेच काही तोफगोळे अजून सापडू शकतील. या तोफगोळ्यासंदर्भात डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक डॉ. सचिन जोशी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, की हे तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून, ते तोफेत दारू भरून नंतर वातीद्वारे उडवीले जात असत. या तोफगोळ्याचे वजन पाच किलोपेक्षा जास्त आहे.

शिवपिंडीस अभिषेक, महाआरती

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले विसापूरवरील शिवमंदिरात भव्य दीपोत्सव करण्यात येतो. यावर्षीदेखील शिवपिंडीस अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर शिवमंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक सचिन टेकवडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, विशाल शिंदे, ऋषिकेश कडू तसेच पुरातत्व विभागाचे कर्मचारी व किल्ल्यावर आलेले बहुसंख्य पर्यटक उपस्थित होते. या दीपोत्सव कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, सागर कुंभार, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, विशाल शिंदे, ऋषिकेश कडू यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT