Dangerous Tree Branches Pudhari
पिंपरी चिंचवड

Vallabhnagar Dangerous Tree Branches: वल्लभनगर म्हाडा वसाहतीवर धोक्याची छाया; घरांवर लोंबकळणाऱ्या २० फुटांच्या फांद्या, नागरिक भयभीत

अहिल्याबाई होळकर मैदानालगतची झाडे धोकादायक स्थितीत; पावसाळ्यात फांद्या कोसळण्याची भीती, तातडीने छाटणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वल्लभगनगर: वल्लभनगर व संत तुकारामनगर येथील म्हाडा वसाहतीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या या वसाहतीत आजही शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, परिसरातील अहिल्याबाई होळकर मैदानाच्या कडेला असलेली विशाल झाडे अनियंत्रित वाढल्याने त्यांच्या तब्बल 15 ते 20 फूट लांबीच्या फांद्या थेट घरांच्या छतांवर, गच्च्यांवर आणि अंगणांवर लोंबकळत आहेत. जोरदार वारा किंवा मुसळधार पावसात या फांद्या कोसळल्यास जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी येथील धोकादायक झाडांच्‍या फांद्या छाटण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अहिल्याबाई होळकर मैदान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि खेळाचे प्रमुख केंद्र आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी येथे महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी येतात. मात्र, मैदानालगत वाढलेल्या धोकादायक फांद्या कधीही तुटून मैदानात येणाऱ्या नागरिकांवर कोसळू शकतात. त्यामुळे घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसोबतच मैदानात येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे अनेक घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा पोहोचेनाशी झाली आहे. पावसाळ्यात सतत ओलावा राहिल्याने साप, विंचू व इतर विषारी कीटकांचा वावर वाढण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांचे दैनंदिन जीवनही त्रस्त झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक परिस्थितीबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का, असा संतप्त सवाल परिसरातील रहिवासी उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिक स्पष्टपणे सांगतात आमची झाडे तोडण्याची मागणी नाही मात्र घरांवर आणि मैदानाच्या परिसरात धोकादायकरीत्या लोंबकळणाऱ्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी. एखादा निष्पाप नागरिक किंवा खेळणारे मूल जखमी झाल्यानंतर कारवाई करून काहीही उपयोग होणार नाही.

धोकादायक परिस्थिती

  • वल्लभनगर–संत तुकारामनगरमधील म्हाडा वसाहतीत धोकादायक परिस्थिती.

  • अहिल्याबाई होळकर मैदानालगतची झाडे अनियंत्रित वाढली.

  • 15 ते 20 फूट वाढलेल्या फांद्या थेट घरांवर लोंबकळत आहेत.

  • मैदानात दररोज महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी वर्दळ.

  • पावसाळ्यात फांद्या कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती.

  • अनेक तक्रारींनंतरही महापालिकेकडून कारवाईचा अभाव.

  • धोकादायक फांद्यांची तातडीने छाटणी करण्याची नागरिकांची जोरदार मागणी.

झाडांच्या फांद्या तुटणे, फांद्या पडणे किंवा मोठी झालेली धोकादायक झाडे याबाबत वेळोवेळी तक्रारी येत असतात. अशा प्रत्येक तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेतो आणि संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देत असतो. सदर ठिकाणाचीही पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
योगेश बहल, नगरसेवक, पिं.चिं. मनपा.
पाऊस सुरू असल्यामुळे सध्या सर्वत्र झाडांची छाटणी सुरू आहे. याबाबत तात्काळ संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. ज्या ठिकाणी धोकादायक झाडे किंवा फांद्या असल्याची तक्रार असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्राधान्याने छाटणी केली जाईल. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली जाईल.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT