संतोष शिंदे
पिंपरी: प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे मागील काही वर्षांत वेगळ्याच कारणांनी चर्चेत येऊ लागला आहे. शाळा-कॉलेज परिसरात टवाळखोर तरुणांकडून ट्रिपल सीट दुचाकीवर फिरणे, शिट्ट्या मारणे, गोंगाट करणे, मुलींकडे पाहून शेरेबाजी करणे, विनाकारण थांबवून बोलण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी दरवर्षी समोर येतात. बहुतांश प्रकरणांमध्ये मुलींची इच्छा नसतानाही संवाद साधण्याचा हट्ट केला जातो. या पार्श्वभूमीवर यंदा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सतर्क झाले असून, शाळा-कॉलेज परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यापूर्वी फक्त शुभेच्छा देणे, गुलाब देणे किंवा मित्रमंडळींसोबत साध्या पद्धतीने आनंद साजरा करणे इतक्यापुरता मर्यादित असलेला व्हॅलेंटाईन डे आता सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ओंगाळवाणा बनत चालल्याचे चित्र आहे. रील्स, स्टंट, बाईकवर मिरवणूक, मोठ्या आवाजात संगीत अशा प्रकारांकडे काही तरुणांचा कल वाढला आहे. या दिखाऊपणातूनच अनेकदा मुलींना त्रास देण्याचे प्रकार घडतात. समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही जण नियम धाब्यावर बसवतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन, हेल्मेटशिवाय दुचाकी, ट्रिपल सीट, गोंधळ यामुळे अपघातांची शक्यता वाढते, त्यामुळेच पोलिसांनी यंदा कारवाईचे हत्यार उपसले आहे.
पालकांचीही जबाबदारी
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना विशेष आवाहन केले आहे. आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, ते कुठे आणि कोणासोबत जात आहेत याची माहिती ठेवणे आवश्यक आहे. प्रेमाचा दिवस साजरा करताना जबाबदारी आणि कायद्याची जाणीव ठेवण्यासाठी पालकांनी समुपदेशन करणे हीच काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पथकांना ‘अलर्ट’
शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्था, उद्याने, कॅफे, मॉल परिसर आणि गर्दीची ठिकाणे येथे पोलिसांची दृश्यमान उपस्थिती राहणार आहे. विशेषतः दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण गोंगाट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दामिनी पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
मुलींच्या सुरक्षिततेची काळजी वाटते
व्हॅलेंटाईन डे म्हटले की, टवाळखोर मुले बाहेर पडणार हे ठरलेलेच असते. मागील काही वर्षांत जे प्रकार पाहायला मिळतात, त्यामुळे पालक म्हणून चिंता वाढते. शाळा किंवा कॉलेज सुटताना मुलींना कोणी त्रास देऊ नये, जबरदस्ती करू नये, हीच अपेक्षा आहे. सोशल मीडियाच्या नादात काही तरुण मर्यादा विसरत चालले आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, हे समाधानकारक आहे; मुलांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीच्या पालकाने ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
व्हॅलेंटाईन डे हा वैयक्तिक साजरा करण्याचा दिवस असला, तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आमची जबाबदारी आहे. कोणत्याही मुलीची छेड काढणे, जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करणे किंवा गोंधळ घालणे सहन केले जाणार नाही. रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्यात येईल. ट्रिपल सीट, गोंगाट किंवा सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड