Assault Pudhari
पिंपरी चिंचवड

Vadgaon Maval Instructor Arrest: पोलिस भरतीच्या प्रशिक्षणार्थी तरुणीवर प्रशिक्षकाकडून अत्याचार; वडगाव मावळात आरोपीला अटक

शौर्य करिअर अकॅडमीच्या चालक-प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा; ॲट्रॉसिटी कायद्यान्वयेही कलम वाढविले

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: येथील केशवनगर भागात सुरू असलेल्या शौर्य करियर अकॅडमीच्या प्रशिक्षकानेच पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

राजू लक्ष्मण माडगी (वय ३१, रा. चतुर्भूज रेसीडेन्सी, वडगाव मावळ) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबई येथील रहिवासी असून, ती वडगाव मावळ येथील केशवनगर परिसरातील शौर्य करिअर अकॅडमी येथे पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होती.

आरोपी हा अकॅडमीचा चालक व प्रशिक्षक असून, २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.०३ वाजल्यापासून २८ ऑगस्ट रोजी पहाटे ५.४० वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या राहत्या घरी नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे.

याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेने सादर केलेल्या जात प्रमाणपत्रानुसार ती अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. त्यानुसार, या प्रकरणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वयेही कलम वाढविण्यात येऊन ॲट्रॉसिटी ही दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांचे पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, शहरप्रमुख राहुल नखाते, संदीप बालघरे, सतीश गरुड, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख भरत भोते, शाखाप्रमुख गोपीनाथ चोरगे, उपविभागप्रमुख कचरू गराडे, वाहतूक सेना अध्यक्ष बाळासाहेब शेलार, उपशहर प्रमुख लक्ष्मण कृपवर, विशाल गांधले, तुषार पवार व दादा मोरे यांनी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना निवेदन देऊन या नराधमावर कठोर कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी व या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT