उर्से मावळ: मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या बालिकेवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हेाते. या वेळी पुकारण्यात आलेल्या मावळ बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
बालिकेच्या अत्याचार-खुनातील आरोपीला फाशी द्या, या मागणीसाठी आज मावळ बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच उर्से, तळेगाव दाभाडे, कडधे, सोमाटणे, कामशेत आदी भागांमध्ये दुकाने, बाजारपेठा व खासगी आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.
चोख पोलिस बंदोबस्त
बंददरम्यान ठिकठिकाणी घोषणाबाजी करत निषेध मोर्चे काढण्यात आले. बालिकांना न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अशा क्रूर घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून, याला आळा घालण्यासाठी कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे सहभागी झाले होते. या वेळी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घटनेचा तपास सुरू आहे. तसेच, या तपासात वरिष्ठ अधिकारीसुद्धा सहभागी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तपासासंदर्भात माहिती दिली जात आहे. तसेच, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.विशाल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिरगाव परंदवडी पोलिस ठाणे