ठाकरे एकत्र आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची वाढली उमेद (File Photo)
पिंपरी चिंचवड

Uddhav-Raj Thackeray Alliance: ठाकरे एकत्र आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची वाढली उमेद

शिवसेना आणि मनसे हे पक्ष सोबत आल्याने शहरात या दोन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कार्यकर्त्यांची उमेद वाढली आहे. शिवसेना आणि मनसे हे पक्ष सोबत आल्याने शहरात या दोन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे. या एकत्रिकरणातून युतीची बिजे पेरली गेल्यास आगामी महापालिका निवडणुकीतही त्याचा फायदा या पक्षाला होईल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कार्यकर्त्यांमधील मरगळ होणार दूर

विधानसभा तसेच, लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे दोन्ही पक्षात काहीशी मरगळ आली होती. दोन्ही पक्ष सत्ताधार्‍यांच्याविरोधात वेगवेगळ्या पद्धतीने लढताना दिसत होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची संधी सोडली जात नव्हती. मराठी भाषेसाठी आणि हिंदीच्याविरोधात तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू सोबत आले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकत्र होणार अशी चर्चा राजकीय रंगली आहे.

दोन्ही पक्षांकडे चार माजी नगरसेवक

सध्या राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात 32 प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत एकत्रित शिवसेनेचे 9 नगरसेवक होते.

दुभंगलेल्या शिवसेनेकडे सध्या तीन माजी नगरसेवक आहेत. तर, मनसेकडे एक माजी नगरसेवक आहे. दोन्ही पक्षात चार माजी नगरसेवक असे महापालिकेतील बलाबल आहे. ठाकरे बंधूपाठोपाठ पक्षही एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे बळ आणखी वाढेल, असा विश्वास स्थानिक पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

मात्र, मनसे महाविकास आघाडीत येणार का, याची उत्सुकता लागली आहे. त्याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनसे शिवसेनेसोबत आल्यानंतर महाविकास आघाडीत येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. साहजिकच महायुतीच्याविरोधात महाविकास आघाडीची ताकद वाढलेली दिसेल, असे स्थानिक पदाधिकारीसांगत आहेत.

संघटन वाढीस चालना मिळणार

पक्षाचे वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे निर्णय घेतील, त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला सामोरे जावू असे, शिवसेनेकडून सांगण्यात आले. तर, ठाकरे बंधू हे मराठीसाठी एकत्र आले आहेत. त्यात युतीचा काही संबंध नाही. त्याबाबत काही घोषणा अद्याप झालेली नाही. या एकत्रिकरणामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, त्यामुळे संघटन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसांच्या आशा आणि नेतृत्वाला नवी दिशा मिळणार आहे. ही महाराष्ट्रासाठी चांगली बाब आहे. राज ठाकरे यांना मानणारा वर्ग शहरात मोठा आहे. त्यामुळे शहरात साहजिकच शिवसेनेसह मनसेची ताकद वाढणार आहे. ठाकरे बॅण्ड एकत्र आल्याने निर्माण झालेला नवा उत्साह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठे बळ देणारा आहे. वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यास हा उत्साह महापालिका निवडणुकीत चमत्कार घडवू शकतो.
- संजोग वाघेरे पाटील, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
हिंदीच्याविरोधात मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या दिवसांची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पूर्ण झाले. हा आनंदाचा दिवस राज्यभरात जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. हा क्षण मनसैनिक व शिवसैनिकांना नवीन चेतना, उभारी, जोश देणारा आहे. ही वाढलेली ताकद पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
- सचिन चिखले, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT