पिंपरी: थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्याजवळ पाणी मोठ्या प्रमाणात फेसाळल्याचे निदर्शनास आले. नदीपात्रात पांढऱ्या शुभ्र फेसाचे थर तरंगत असल्याने रासायनिक प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
केजुदेवी बंधाऱ्यावर फेसाचे मोठे लोट दिसून आले. बंधाऱ्यात यापूर्वीही विषारी पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रासायनिक प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, प्रक्रिया न केलेले सांडपाणी पवना नदीत सोडणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. याआधी पाण्याला असाच फेस आला होता.
पवना नदी हेच पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक पाणी थेट नदीत सोडले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील अनेक नालेही थेट नदीला मिळत असल्याने पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची नदी दूषित होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नदीप्रदूषणामुळे जलचर, वनस्पती आणि पर्यावरण धोक्यात आले असून, दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रदूषणाचे मूळ शोधावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता विनायक ओव्हाळ यांच्याशी संपर्क केला असता, थेरगाव येथील नदीपात्रातील पाणी कशामुळे फेसाळले, हे शोधण्यासाठी स्कॉडला पाठविले आहे. त्यानंतर याबाबत माहिती मिळू शकेल, असे सांगितले.