पिंपरी: थेरगाव परिसरात प्रेमप्रकरणाच्या रागातून एका 19 वर्षीय तरुणाची चॉपर आणि चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तर त्याच्या चुलत भावालाही मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि. 7) रात्री अकराच्या सुमारास थेरगावमधील शिवशंकर कॉलनी आणि श्रीकृष्ण दूध डेअरीसमोरील रस्त्यावर घडली.
सुभान हमीद शेख (19, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्शद रमजान शेख (21, रा. थेरगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला संबंधित तरुणीच्या आईचा विरोध होता.
तरुणीच्या आईचा मित्र असलेल्या विशाल सूर्यवंशी याने सुभानला या संबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला गाठले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपींनी जवळील चाकू आणि चॉपरने सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर वार केले. सुभानला वाचवण्यासाठी आलेल्या अर्शदवरही आरोपींनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103, 109, 3(5), आर्म ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलिस तपास करत आहेत.
तुरुंगातून सुटला; पाचव्या दिवशीच खून
मयत सुभान शेख याच्यावर काही महिन्यांपूर्वी स्वतःच्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीनंतर तो अवघ्या पाच दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर सुभान पुन्हा संबंधित तरुणीला त्रास देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तरुणीच्या आईने आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना सुभानला समज देण्यासाठी पाठवले होते. मात्र, त्यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला. त्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात चॉपर आणि चाकूने हल्ला करून सुभानची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.