Contaminated Ice Health Risk: सावधान! शीतपेयांबरोबर बर्फ खाताय; दूषित बर्फ देताये आजाराला निमंत्रण

इतकेच नव्हे तर, या बर्फाची वाहतूक आणि साठवणूक ज्या पद्धतीने केली जाते, ती अत्यंत अस्वच्छ असते.
Contaminated Ice Health Risk
Contaminated Ice Health RiskPudhari
Published on
Updated on

मोशी: उन्हाळ्याच्या सुट्‌‍ट्या असोत किंवा मित्रांसोबतची पार्टी, अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी आपण आवडीने ‌‘कोल्ड ड्रिंक्स‌’ किंवा इतर शीतपेय पितो. या पेयांचा गारवा वाढविण्यासाठी त्यात जो बर्फ घातला जातो, तो प्रत्यक्षात तुमच्या आरोग्यासाठी किती घातक असू शकतो, याचा आपण कधी विचारही करत नाही.

नुकत्याच समोर आलेल्या काही धक्कादायक माहितीनुसार, हॉटेल्स, रसवंती गृहे आणि रस्त्यांवरील गाड्यांवर वापरला जाणारा बहुतांश बर्फ हा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा नसून चक्क दूषित पाण्याचा असतो.

Contaminated Ice Health Risk
सत्ताधाऱ्यांकडून नामकरणाचा धडाका! भोसरी रुग्णालयास अटल बिहारी वाजपेयी, तर कॅन्सर रुग्णालयास लक्ष्मण जगतापांचे नाव

अनेक ठिकाणी हा बर्फ औद्योगिक कारणांसाठी तयार केलेल्या ‌‘इंडस्ट्रियल आईस‌’च्या स्वरूपात असतो, जो बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी फिल्टर केलेले नसते. इतकेच नव्हे तर, या बर्फाची वाहतूक आणि साठवणूक ज्या पद्धतीने केली जाते, ती अत्यंत अस्वच्छ असते.

अनेकदा उघड्या गाड्यांमधून, जमिनीवर ओढत किंवा खराब पोत्यात गुंडाळून हा बर्फ विक्रीसाठी आणला जातो. या गंभीर विषयावर वैद्यकीय तज्ज्ञांनी मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, दूषित पाण्यापासून तयार केलेल्या या बर्फामध्ये ई-कोलाय आणि कोलिफॉर्मसारखे घातक जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळतात.

Contaminated Ice Health Risk
सत्ताधाऱ्यांकडून नामकरणाचा धडाका! भोसरी रुग्णालयास अटल बिहारी वाजपेयी, तर कॅन्सर रुग्णालयास लक्ष्मण जगतापांचे नाव

जेव्हा हा बर्फ आपल्या शीतपेयात विरघळतो, तेव्हा हे जीवाणू थेट आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे कॉलरा, टायफॉइड, कावीळ आणि गॅस्ट्रोसारखे गंभीर जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता वाढते.

असा होऊ शकतो त्रास

विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा फटका लवकर बसतो. अनेकदा शीतपेय प्यायल्यानंतर घसा दुखणे किंवा टॉन्सिल्सचा त्रास होण्याचे मुख्य कारण पेयाचे तापमान नसून त्यातील दूषित बर्फ असतो.

त्यामुळे बाहेर शीतपेय पिताना तो बर्फ खरोखरच पिण्याच्या पाण्याचा आहे का, याची खात्री करणे कठीण असल्याने, तज्ज्ञ शक्यतो बर्फ विरहित पेये घेण्याचा किंवा घरी बनवलेला बर्फ वापरण्याचा सल्ला देत आहेत. तुमची एक छोटीशी खबरदारी तुम्हाला मोठ्या शारीरिक व्याधींपासून वाचवू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात आमचे नमुने घेऊन सतत तपासण्या चालू असतात. केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर नागरिकांच्या तक्रारीची देखील आम्ही तातडीने दखल घेत कारवाई करतो. तरी नागरिकांना आवाहन आहे की, त्यांना कुठेही असा गैरप्रकार आढळल्यास किंवा संशय आल्यास आमच्या विभागाशी संपर्क साधावा.

- दिगंबर भोंगावडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

उन्हाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी, उघड्यावरील शीतपेय आणि खराब अन्नामुळे डायरिया व गॅस्ट्रोसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. विशेषत: लहान मुलांना याचा धोका अधिक असतो. जुलाब, उलट्या किंवा ताप यांसारखी लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ला पालकांनी घ्यावा.

- डॉ. अमोल फुलसुंदर, बालरोग तज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news