

पिंपरी: थेरगाव येथील केजुदेवी बंधारा परिसरात शुक्रवार (दि. 8) सकाळी पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले होते. यावर्षातील ही तिसरी घटना असून नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी मिसळले जात असल्याने मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला होते.
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी तसेच कयाकिंग खेळासाठी बोटक्लब येथे आलेल्या खेळाडूंनी नदीतील प्रदूषण पाहून चिंता व्यक्त केली. हिरव्यागार झाडीतून वाहणाऱ्या पवनामाईचे बदललेले स्वरूप पाहून स्थानिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल केले आहेत. वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक पाणी थेट नदीत सोडले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील अनेक नालेही थेट नदीला मिळत असल्याने पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची नदी दूषित होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नदी प्रदूषणामुळे जलचर, वनस्पती आणि पर्यावरण धोक्यात आले असून दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रदूषणाचे मूळ शोधावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.