मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून संपूर्ण शहराला पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही भागांत दूषित तसेच, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्याचे नमुने दाखविल्यानंतरही महापालिका प्रशासन पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा करीत आहे.
महापालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण 228 कोटी रुपयांचा खर्च करते. पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी घेत असल्याने महापालिका दरवर्षी सुमारे 45 कोट्यवधी रूपयांचे शुल्क पाटबंधारे विभागास अदा करते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जात असून, त्याचे बिल एमआयडीसीला दिले जाते. अशुद्ध पाणी उपसा, जलशुद्धिकरण, पाणीपुरवठा व्यवस्थापन, पाण्याच्या टाक्या, पाणीपुरवठा विभागाचे मनुष्यबळ, नियमित व दुरुस्ती कामे आदींसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च महापालिकेस करावा लागतो. संपूर्ण शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.
ऐन उन्हाळ्याच्या हंगामात शहरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घाण पाण्यामुळे जुलाब, उलट्या, मळमळणे, ताप आदी आजार होत आहेत. विशेषत: लहान मुले व ज्येष्ठांना त्यावर त्यांचा अधिक दुष्परिणाम दिसून येत आहे. नियमितपणे पाणीपट्टी भरूनही पिण्यासाठी घाण पाणी येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घेऊन आणि गळती दुरुस्ती केल्यानंतरही असे प्रकार कायम आहेत. उन्हाळ्यात काही भागांत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा तर, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात गढूळ पाणीपुरवठा होतो. शहरातील अनेक भागांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. त्या पाण्याची पिंपरी येथील खासगी प्रयोगशाळेत दोन वेगवेगळ्या प्रकारे तपासणी केली जाते. तसेच, महापालिकेच्या निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळेतही तपासणी केली जाते. या दोन्ही प्रयोगशाळेत महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत करत असलेल्या तक्रारींत तथ्य नसल्याचा महापालिका प्रशासनाचे मत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेकडून नियमितपणे शहरातील क्षेत्रीय कार्यालयानुसार प्रत्येक भागांतून पिण्याचे पाण्याचे नमुने घेतले जातात. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. एक जानेवारी ते 31 मार्च 2025 या तीन महिन्यांत तब्ब 22 हजार 288 पाण्याचे सॅपल तपासले गेले आहेत. त्यात सर्व ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य म्हणजे निगेटिव्ह असल्याचे अहवालावरून समोर आले आहे. शहरातील कोणत्याही भागांतील पाणी हे पिण्यायोग्य नाही, असे एकाही ठिकाणच्या नमुन्यात आढळून आलेले नाही. तसेच, पिंपरीतील खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या शहरभरातील वेगवेगळ्या 48 नमुन्यातही पाणी पिण्यायोग्य असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. हा तपासणी अहवाल 48 तासांत प्राप्त होतो. तो अहवाल दरमहा राज्य शासनाला सादर केला जातो.
पाण्यातील पी. एच. म्हणजे पाण्याचे आम्लीय किंवा मूलभूत प्रमाण (अॅसिडिक किंवा बेस) मोजण्यासाठी वापरले जाणारे एक माप आहे. हे 0 ते 14 पर्यंतच्या स्तरावर मोजले जाते. जिथे 7 तटस्थ (न्यूट्रल) मानले जाते. 7 पेक्षा कमी पी. एच. म्हणजे पाणी आम्लयुक्त (अॅॅसिडिक) आहे. 7 पेक्षा जास्त पी. एच. म्हणजे पाणी मूलभूत (बेसिक) आहे. तसेच, प्रयोगशाळेत पाण्यातील गढळूपणा, जडपणा, क्लोरिनचे प्रमाण आणि ई. कोली विषाणूचे प्रमाण तपासले जाते.
जलशुद्धीकरण केंद्रांत पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन पावडरऐवजी आता क्लोरीन वायू स्वरूपात वापरला जातो. त्यासाठी सहा गॅसटाक्या जोडलेल्या आहेत. त्या संपल्या की पर्यायी गॅस टाक्या आहेत. त्यामुळे 24 तास क्लोरीन गॅस पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया सुरू असते. पाण्यात क्लोरिन मिसळल्याने महापालिकेद्वारे पुरवठा केल्या जाणार्या पाण्यात विषाणू (बॅक्टेरिया) तयार होऊ शकत नाहीत. क्लोरिन नसल्यास विषाणू तयार होतात, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेच्या नळास थेट विद्युत मोटार पंप (टिल्लू पंप) लावून पाणी खेचले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाने संपूर्ण शहरात तपासणी मोहीम राबवून केलेल्या कारवाईत तब्बल 250 पंप जप्त केले आहेत. कारवाई केल्याने चिडलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.