

Ahilyanagar news : राहुरी/वांबोरी : खोटा गुन्हा दाखल करत बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल केल्याने मानसिक तणावाखाली येत तरुणाने आत्महत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेहासह नातेवाईकांनी पोलिस दूरक्षेत्रासमोर आंदोलन केल्याने वांबोरीत तणाव निर्माण झाला आहे. सात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत रेेल्वे पोलिसांनी पेट्रोलपंपाचे मालक बापलेकाविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्याने तणाव निवळला.
निखील रावसाहेब देवकर (वय 23, रा. वांबोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे-पाटण रेल्वेखाली बुधवारी मध्यरात्रीनंतर निखिल याने उडी मारत आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. निखीलचे नातेवाईकही रुग्णालयात जमा झाले. गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रुग्णवाहिकेतील मृतदेहासोबत चारशे-पाचशे नातेवाईकांचा जमाव वांबोरी पोलिस दूरक्षेत्रासमोर आला. मृत निखीलवर खोटा गुन्हा दाखल करत सोशल मिडियावर त्याची बदनामी केली. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करत त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक नातेवाईकांनी केली.
गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने वांबोरीत तणाव निर्माण झाला. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून सात तास आंदोलन सुरू होते. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता राहुरीहून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वांबोरीत दाखल झाला.
राधेशाम दत्तात्रय कुसमुडे (रा.वांबोरी) यांच्या फिर्यादीवरून रेल्वे पोलिसांत भारतीय न्यायसंहिता कलम 108,3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांबोरी येथील शांतिलाल कांतीलाल अॅण्ड सन्स पेट्रोलपंपाचे मालक किरण शांतीलाल मुनोत व त्यांचा मुलगा सुमीत यांच्या सांगण्यावरून कुसमुडे यांचा भाचा निखील देवकरविरुध्द खोटा गुन्हा दाखल झाल्याने त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करतेवेळी निखीलचे कपडे, त्याचा मोबाईल तपासासाठी शुक्रवारी अहिल्यानगर लोहमार्ग पोलिसांकडे जमा करावा, अशी नोटीस कुसमुडे यांना तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.डी. साळवे यांनी बजावली आहे.
18 एप्रिल 2025 रोजी वांबोरी येथील शांतिलाल कांतीलाल अॅण्ड सन्स पेट्रोल पंपावर कामगारांना शिवीगाळ करुन घुडधूस घातल्याच्या आरोपाखाली सहा जणांविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यात निखील देवकर यांचेही नाव होते. तेव्हापासून तो गायब होता. पेट्रोल पंपावरी घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यातून बदनामी झाली, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
खोटा गुन्हा दाखल करून निखीलची बदनामी करण्यात आली. मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्या केली. सुमित किरण ऊर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत यांनी बदनामी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सुमित किरण ऊर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलिस चौकीसमोर ठिय्या दिला. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वांबोरीत तणाव निर्माण झाला आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.