संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकीचे रणशिंग फुंकायच्या आधीच उद्धव ठाकरे सेनेच्या छावणीतून एकामागून एक तंबू उचलले जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. शहरप्रमुख सचिन भोसले असोत किंवा पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजोग वाघेरे, महिला आघाडी शहर संघटिका रूपाली आल्हाट, भोसरी विधानसभा शहर संघटक तुषार सहाणे, नेताजी काशिद या सगळ्यांनीच जवळपास एकाच वेळी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वेगळ्याच दिशेने कूच केल्याने, शहरात ठाकरे गटाचा चेहरा शोधण्यासाठी आता भिंग काढावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्व पक्षाने कंबर कसून जय्यत तयारी सुरू केली आहे; मात्र निवडणुकीचे युद्ध सुरू होण्यापूर्वीच ठाकरे सेनेच्या सेनापतींनीच रणांगण सोडल्याने खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांनी झेंडे गुंडाळले, घोषणा शांत केल्या. त्यामुळे समर्थक ’आता करायचं तरी काय?’ या संभमात अडकले आहेत. दुसरीकडे विरोधक मात्र या गोंधळाकडे ‘पॉपकॉर्न मोड’ मध्ये पाहत असल्याचे चित्र आहे. या सगळ्या घडामोडींवर माजी आमदार व सध्याचे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार मात्र अजिबात विचलित झाल्याचे दिसत नाहीत.
पक्षातून कितीही गेले तरी काही फरक पडत नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी गेलेल्यांनाच मिश्किल शैलीत टोला लगावला. पक्षामुळेच त्यांची ओळख होती, असे म्हणत ‘नेते पक्षामुळे मोठे, पक्ष नेत्यांमुळे नाही’ हा जुना पण चघळलेला राजकीय मंत्र त्यांनी पुन्हा एकदा सांगितला. इतकेच नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 136 इच्छुकांचे अर्ज आल्याचे सांगत त्यांनी आत्मविश्वासही दाखवला; तसेच निवडणुकीत ठाकरे गटाची जादू दिसेल, असा दावा करत त्यांनी विरोधकांच्या हसण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
एकीकडे मैदानात उतरण्याआधीच माघार घेणारे नेते, तर दुसरीकडे ‘काहीही फरक पडत नाही’ असा निर्धार असलेले उरले सुरले कार्यकर्ते या दोन टोकांमधील संघर्ष पाहता, पिंपरी-चिंचवडची महापालिका निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार आहे. आता प्रश्न एवढाच आहे की, ऐन युद्धावेळी गायब झालेले सैन्य परत येणार का, की रणांगणात उरलेले काही मोजकेच शिलेदार मशाल पेटवण्याचा प्रयत्न करणार?
सेनापतीच गायब!
ऐन युद्धाच्या तोंडावर ठाकरे सेनेच्या सेनापतींचेच पलायन झाल्याने छावणीत शांतता आणि चर्चा जास्त सुरू आहेत. नेते गेले, झेंडे गुंडाळले, घोषणा थंडावल्या आणि कार्यकर्ते मात्र अजूनही ‘आदेश कधी येणार?’ याची वाट पाहत आहेत. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, पिंपरी-चिंचवडचे राजकारण सध्या गंभीरपेक्षा जास्त खुसखुशीत वळणावर आले आहे. अंतिम निकाल काय लागणार, हे मात्र मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.