

मिलिंद कांबळे
पिंपरी: पक्षनिष्ठा, जुने, नवे, उपरे, मित्रपक्ष आणि विद्यमान यासह हौशा-नवशा इच्छुकांची संख्या 700 च्या वर गेलेल्या शिस्तप्रिय भारतीय जनता पार्टीसमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी या सर्वच इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास काय करणार, बंडखोरी करणार नाही, असे स्टँप पेपरवर लिहून द्या, अशी धमकीवजा विनंती करत मनधरणी करण्याची वेळ कोअर कमिटीवर आली आहे. या अजब सक्तीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्ता काबीज करीत भाजपाने फेब्रुवारी 2017 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपला झेंडा फडकाविला. तब्बल 77 नगरसेवक एकट्या भाजपाचे होते. पक्षाने गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता गाजवली. आता, पुन्हा महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपा सरसावली आहे. सर्व 128 जागांवर उमेदवार देण्याची तयारी करून, जवळजवळ उमेदवारांची यादी फायनल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तेची फळे चाखण्यासाठी शहरात भाजपाकडे मोठ्या इच्छुकांची रांग लागली आहे. सातशेपेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज नेले. त्यात विद्यमान व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मित्र व विरोधी पक्षांतील विद्यमान व माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, युवावर्ग, महिला अशांचा भरणा अधिक आहे.
दरम्यान, निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मंगळवार (दि. 16) भाजपाने मुलाखतीचा कार्यक्रम सुरू केला. त्या मुलाखती बुधवारी (दि.17) अक्षरश: आटोपण्यात आल्या. शेवटच्या टप्प्यात प्रभागातील सर्वच इच्छुकांच्या एकाच वेळी सामूहिक मुलाखती घेत तो कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. त्यावरून इच्छुकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अगोदर उमेदवारांची नावे निश्चित केली असून, मुलाखतीचा केवळ फार्स केला जात असल्याची टीका काही नाराज इच्छुकांनी केली.
इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपासमोर बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. भाजपाकडून शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला काही जागा सोडण्यात येणार आहेत. साहजिकच सर्व 128 जागा भाजपाला लढता येणार नाही. इच्छुकांची संख्या भरमसाठ त्यात कमी झालेल्या जागा आदींमुळे पक्षाच्या कोअर कमिटीसमोर उमेदवारीसाठी कोणाकोणाला रोखणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंडखोरी करणार नाही, असे सर्व इच्छुकांकडून वदवून घेतले जात होते. तसेच, बंडखोरी करत दुसऱ्या पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून लढणार नाही, निवडणुकीत पक्षाचे काम निष्ठेने करणार, असे स्टँप पेपरवर लिहून द्या, अशी मनधरणी करण्याची वेळ कमिटीच्या सदस्यावर आली आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी दंड थोपटले आहेत. सत्तेसाठी वर्चस्व पणाला लावू अशी गर्जना पवारांनी केली आहे. महापालिकेत त्या पक्षाचे 36 नगरसेवक होते. महायुतीत असल्याने तसेच, शहरात अजित पवारांचे वलय कायम असल्याने साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेही इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. मित्र व विरोधी पक्षातील विद्यमान व माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत मुलाखतही दिली आहे. पक्षातील इच्छुकांना तिकीट देणार की, बाहेरुन आलेल्यांना देणार, असा प्रश्न अजित पवारांसह वरिष्ठ नेत्यांसमोर उभा झाला आहे. पक्षाला बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून मुलाखतीच्या वेळेस बंडखोरी न करण्याची सूचना कोअर कमिटीकडून केली जात होती. राजकीय पक्षांकडून होत असलेल्या या मनधरणीची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
आम्ही केवळ पक्षकामासाठी खपायचे का ?
भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसर्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार, अशी कुजबूज सुरू आहे. त्यामुळे पक्षातील जुने व निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच, माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. आम्ही पक्षाचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करायचे, ऐन निवडणुकीच्या वेळी आम्हांला डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना तिकीट द्यायचे, हा प्रकार योग्य नाही. आम्ही केवळ पक्षाचे काम करत खपायचे का, असा संतप्त प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.