

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा तीन या स्पर्धात्मक अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिखरे व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्याध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने हे अभियान राबवण्यात येत असून, या अभियानात तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन माध्यमिक मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आले आहे. या अभियानामुळे शैक्षणिक गुणवत्ताबरोबरच आरोग्य स्वच्छता, पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळू शकेल, असे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड यांनी या वेळी सांगितले.
1 जानेवारी ते 7 फेबुवारी या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया करण्यात येणार असून हे अभियान एकूण 200 गुणांचे आहे. यामध्ये 1 पायाभूत सुविधाकरिता 38 गुण 2 शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी 101 गुण व 3 शैक्षणिक संपादनूक 61 गुण अशी या गुणांची विभागणी केली जाणार आहे.
या अभियानात तालुका पातळीवरील सर्व शाळांमधून एकूण 3 क्रमांक काढण्यात येणार आहेत शासनाकडून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख रुपये व तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे माळशिखरे यांनी या वेळी सांगितले.