पिंपरी: मागील निवडणुकीत या प्रभागात माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे संपूर्ण पॅनेल विजय झाले होते. पुन्हा पक्षाचे पॅनेल राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. तर, भाजपाने फोडाफोडी करीत प्रभाग ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राष्ट्रवादीचे पॅनेल फोडले आहे. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत.
तर, राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर यांच्यासह शरद भालेकर, सीमा धनंजय भालेकर, चारुलता रितेश सोनवणे हे इच्छुक आहेत. तसेच, रवींद्र सोनवणे, भाजपाकडून शीतल धनंजय वर्णेकर, आशा भालेकर, शांताराम भालेकर, शिवसेनेतून भाजपात गेलेले सुकदेव नरळे, अरुणा भालेकर व इतर इच्छुक आहेत. तसेच, नयना बोराटे, रावसाहेब थोरात, संदीप जाधव, अमोल भालेकर, सारिका भालेकर, अमृता जंगले, नूर शेख, शरद भालेकर, नवीन भालेकर, कोंडिबा भालेकर, धनंजय भालेकर, शीतल पवार, सुजाता काटे, सर्जेराव गावडे, कौशल्या सोलवनकर, दादा नवले, अनिल भालेकर, बापू जाधव, शिरीष उत्तेकर आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून पुन्हा संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचा इरादा आहे. तर, भाजपाकडून विजयासाठी वेगवेगळ्या प्रकारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. राष्ट्रवादी पॅनेल राखणार की, भाजपा पॅनेलवर कब्जा करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील परिसर
तळवडे, तळवडे गावठाण, एमआयडीसी, आयटी पार्क, ज्योतिबा नगर, गणेशनगर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रे वस्ती भाग, शिवसृष्टी सोसायटी आदी.
बायोडायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू
प्रभागात भूमिगत विद्युत केबलचे काम झाले आहे. प्रभागात वाहतूक पोलिस चौकी व स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तळवडे, रुपीनगरात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. तळवडे स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आवश्यक तेथे जलवाहिनी, ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटाची दुरुस्ती करून तळवडे गायरान जागेस सीमाभिंत घातली आहे. तळवडेतील 59 एकर गायरान जागा महापालिकेस मोफत मिळाली असून, तेथे बायोडॉयर्व्हसिटी पार्क विकसित करण्याचे काम सुरू आहे. तेथे दाट वन तयार केले जात आहे. महावितरण कंपनीकडून वीज उपकेंद्र उभारणीस सुरुवात झाल्याने या भागांतील वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. रेड झोन भागातील सर्व मालमत्ताधारकांना एक एप्रिल 2026 पासून मालमत्ताकरात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ- ओबीसी
ब- सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
रेड झोन भागात अनधिकृत बांधकामांचे पेव
रेड झोन बाधित हा परिसर असल्याने बांधकाम करता येत नाही. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहे. ती अनधिकृत घरे सर्वसामान्यांच्या माथी मारली जात आहेत. दाट लोकवस्तीमुळे नागरी सुविधांचा ताण वाढत आहे. महापालिकेने मोठे प्रकल्प करण्यास दुर्लक्ष केले जात असल्याने हा भाग विकासापासून दूर आहे. रुपीनगरातील महापालिकेने उभारलेल्या रेड झोन बाधित घरकुल प्रकल्प धूळ खात पडून आहे. काही भागांत पाणीपुरवठा अपुरा आहे. वीज खंडित होत असल्याने रहिवाशी त्रस्त आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. दुकानदार, विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडी होते. अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने वारंवार लहान-मोठे अपघात होतात.