वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने 250 बेडचे तालेरा रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. मात्र, याठिकाणी फक्त प्रसूतीवरच जास्त भर दिला असल्याने अन्य आजारांच्या रुग्णांना मनपाच्या इतर रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव दिसत आहे.
आयसीयूमध्ये शिकाऊ डॉक्टर
सध्या चिंचवडगावातील नवीन तालेरा रुग्णालयात 250 बेडची क्षमता असून, येथे स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडिकल विभाग, डायलिसिस सेंटर, अतिदक्षता विभाग तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग या सर्व सुविधा आहेत. तालेरा रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. आयसीयूसारख्या ठिकाणी शिकाऊ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. अशातच एखाद्या रुग्णाची प्रकृती खूप बिघडली तर अशा तातडीच्या वेळी सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी वाढते.
रुग्णालयात स्वच्छतागृहांची दुरवस्था
रुग्णालयात स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेले स्वच्छतागृह नादुरुस्त आहे. त्यामुळे नातेवाईकांना दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जावे लागते. तसेच, पहिल्या मजल्यावर स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता दिसून येत आहे.
नेफ्रोलॉजिस्ट नाही
रुग्णालयात मोफत डायलिसीसची सुविधा आहे. मात्र, याठिकाणी नेफॉलॉजिस्ट नाही. टेक्निशियन डायलिसिस करतात. त्यांनतर त्याचा रिपोर्ट घेऊन पुढील मार्गदर्शनासाठी बाहेरील नेफॉलॉजिस्टकडे जावे लागते.
खासगी लॅबप्रमाणेच तपासणीचे पैसे
रुग्णालयात लॅब आहे. याठिकाणी रक्त, लघवी, थुंकी आणि इतर तपासणी होतात. मात्र, येथे खासगी लॅबप्रमाणे पैसे आकारले जातात. ज्येष्ठ नागरिकांना थोडी सवलत आहे. मात्र, इतर रुग्णांकडून खासगी दराप्रमाणे पैसे घेतले जातात.
निवारा शेड, कॅन्टिन नाही
रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री झोपण्यासाठी आणि त्यांचे सामान ठेवण्यासाठी निवारा शेड नाही. त्यामुळे नातेवाईक वॉर्डमध्ये जागा मिळेल तेथे आराम करतात. तसेच, कॅन्टिन नसल्याने नातेवाईकांची खाण्यापिण्याची आबाळ होते. बाहेरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा याठिकाणी वावर असतो.
न्या तालेरा रुग्णालयात 30 खाटांचा बर्न वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये 6 खाटांचा आयसीयू, 12 खाटांचा महिला वॉर्ड आणि 12 खाटांचा पुरुष वॉर्ड सुरू केला जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक हायड्रेशन युनिट, प्लास्टिक सर्जरीची सुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन विभाग आदी सोयी करण्यात येणार आहेत. जुन्या तालेरा रुग्णालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत होऊन दोन वर्षे झाली तरी अद्याप बर्न वॉर्डचे काम अपूर्ण आहे.
ॲडमिट रुग्णांबरोबर असलेल्या नातेवाईकांना याठिकाणी निवाराशेड नाही. त्यामुळे वॉर्डमधल्या पॅसेजमध्ये रात्री झोपावे लागते. आमच्याबरोबर सामान आणि पैसेदेखील असतात. एवढ्या पाच मजली इमारतीमध्ये निवाराशेड असायला पाहिजे.दिलीप सावंत, नागरिक
तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहाबाबत आम्ही स्थापत्य विभागाला कळविले आहे. वारंवार चोकअप होत असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात निवारा शेडची आवश्यकता आहे. नवीन रुग्णालयात कॅन्टिन नाही. जुन्या तालेरा रुग्णालयात कॅन्टिनची सोय केली आहे.डॉ. संजय सोनेकर, प्रमुख, तालेरा रुग्णालय