

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2026-27 च्या अर्थसंकल्पास नगरसेवकांसह स्थायी समितीने तब्बल 1 हजार 100 कोटी रुपये खर्चाच्या उपसूचना दिल्या होता. मात्र, त्यातील 80 टक्के उपसूचना फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या त्या उपसूचना सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजूर करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. प्रभागनिहाय कामासाठी निधी वळवण्याच्या असंख्य उपसूचना गेल्या शुक्रवारी (दि. 15) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्या आहेत.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्यात सत्ताधाऱ्यांनी अनेक विषयांना उपसूचना देऊन निधी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून नाराज नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विषयपत्रिकेवरील महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या जलक्षेत्रातील परिचालन व देखभाल व दुरुस्ती कामास मुदतवाढ देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्याला निधीत वाढ व घट करण्याचे तसेच, नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याच्या अनेक उपसूचना मंजूर करण्यात आल्या आहेत.
शहरातील ड्रेनेजलाईनचा मास्टर प्लॅनअंतर्गत नवीन मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, शहरातील सर्व नाल्यांतील ड्रेनेजलाईन पर्यायी जागेत हलविणे, नवीन ठिकाणी ड्रेनेजलाईन टाकणे, ताथवडे आणि दापोडीतील सीएमई येथे नवीन मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणे तसेच, विविध क्षेत्रीय कार्यालय हद्दीतही अशी कामे केली जाणार आहेत. त्या कामासाठी निधीच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. नगरोत्थान महाभियानाअंतर्गत व केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत किवळे येथील सर्व्हे क्रमांक 96 मधील पंप हाऊस येथे एनर्जी सेव्हिंग करता नवीन मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यास प्रशासकीय मान्यता देणे, चिखली येथील नदीकडेच्या 18 मीटर तसेच, देहू-आळंदी रस्ता ते सोनवणे वस्तीचा उर्वरित 24 मीटर रस्ता विकसित करणे, पाणीपुरवठा विभागाच्या विविध 32 ठिकाणी असलेल्या पंप हाऊसचे चालन व देखभाल-दुरुस्तीच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याच्या उपसूचनेस मंजूरी देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 5 आणि 14 मधील विद्युत दिव्यांच्या खांबांना शॉक प्रुफ रंग लावणे, विद्युत दिव्यांचे नूतनीकरण करणे, पिंपरी येथील महात्मा फुले सृष्टीमध्ये म्युरलची उर्वरित कामे करणे, पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यत मोकळ्या जागेत खेळाचे मैदान विकसित करणे आणि लिनिअर गार्डनमधील उर्वरित कामे करण्यासाठी 2 कोटी 50 लाख निधीची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. भामा आसखेड पाणी योजनेसाठी 1700 मिलिमीटर व्यासाची तसेच, 1400 मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी सुधारित 12 कोटीची तरतूद करणे आणि प्रशासकीय मान्यता देणे, प्रभाग क्रमांक 18 मधील गणपती विसर्जन घाट, मोरया गोसावी समाधी सोहळा, क्रांतीवीर चापेकर स्मारक वाडा आदी ठिकाणी विद्युत कामे करणे, बोपखेल परिसरातील 12 मीटर व 18 मीटर रुंदीचे रस्ते विकसित करणे, प्रभाग क्रमांक 5 मध्ये वेगवेगळे रस्ते विकसित करण्याच्या उपसूचनेस मंजूरी देण्यात आली आहे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकात सबवे निर्माण करण्यासाठी 35 ऐवजी 51 कोटींच्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक सिग्नल फ्री करण्यासाठी 45 ऐवजी 86 कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसृष्टी उभारणे, रस्ते तयार करणे व जलतरण तलाव व व्यायाम शाळा बांधणे या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील 12 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांचा हरित सेतूअंतर्गत अर्बन स्ट्रीटने विकास करणे, प्रभाग चारमध्ये रस्ते विकसित करणे, महापालिकेच्या 32 प्रभागांमध्ये फेरफार करून आठऐवजी दहा क्षेत्रीय कार्यालय निर्माण करणे आणि त्यांना किल्लयांची नावे देणे, प्रभाग क्रमांक 18 येथील विरुंगळा केंद्रात लिफ्ट उभारणे, आदी कामांसाठी तरतूद करण्यास उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्षाची निर्मिती
सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी नवीन लेखाशीर्ष (हेड) तयार करण्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेने हरितसेतू प्रकल्पासाठी ग्रीन बॉण्डद्वारे 200 कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. तो निधी खर्च करण्यासाठी सर्वसाधारण निधीऐवजी हरित सेतू प्रकल्प या स्वतंत्र निधीमधून केला जाणार आहे. विविध प्रकल्प व रस्ता रुंदीकरणाने बाधित झालेल्या व बेघर झालेल्या नागरिकांना सदनिका दिल्या जातात. बाधित लाभार्थ्यास रक्कम जमा करण्यासाठी बेघरांसाठी घरे/प्रकल्प बाधित लाभार्थी रक्कम या नावाने नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात येणार आहे. एसआरए प्रकल्पात विकसकाला पायाभूत सुविधा विकास शुल्क भरावे लागते. ते शुल्क झोपडपट्टी पायाभूत सुविधा व देखभाल दुरुस्ती निधी या लेखाशीर्षावर जमा केला जाणार आहे.
लेखा विभागाने ग्राह्य केलेल्या उपसूचनांसह अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी
महापालिकेच्या 24 मार्चच्या विशेष सभेत ठराव क्रमांक 9 नुसार सन 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्पास उपसूचनेसह मान्यता देण्यात आली आहे. त्या मान्य अर्थसंकल्पातील सर्व भांडवली व महसूली कामांना व महसुली अर्थसंकल्पातील वस्तू व सेवांच्या खरेदीच्या लेखाशीर्षासमोर दर्शविलेल्या एकूण अर्थसंकल्पीय रकमेस महापालिका सभेची एकत्रित प्रशासकीय मान्यता देण्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, सभावृत्तांत कायम करताना सभेत उपसूचना दाखल करण्यात आल्या आहेत. लेखा विभागामार्फत त्या उपसूचना ग्राह्य व अग्राह्य कण्यात आल्या आहेत. ग्राह्य व अग्राह्य उपसुचनांसह सन 2026-27 चा अर्थसंकल्पाला अंतिम करण्यास मान्यता देण्याच्या दुरुस्तीसह सभावृत्तांत कायम करण्यात आला आहे.
चिखली टॉऊन हॉलसाठी दोन वेगवेगळी नावे
चिखली येथील टॉऊन हॉलला सत्ताधारी भाजप तसेच, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेगवेगळी नावे देण्याच्या उपसूचना सभेत देण्यात आल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून जगद्गगुरू संत तुकाराम महाराज असे नाव देण्याची उपसूचना आहे. ती उपसूचना भाजपचे कुंदन गायकवाड व निखिल बोऱ्हाडे यांनी दिली आहे. तर, टॉऊन हॉलला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास साने व अनंत कोऱ्हाळे यांनी दिली आहे. तसेच, महापालिका शाळेला अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशीही उपसूचना त्यांनी दिली आहे. महापौर रवी लांडगे या पैकी कोणत्या नावाची उपसूचना स्वीकारणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.