तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथे दर रविवारी आठवडे बाजार भरतो. परंतु, या बाजारावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने व्यावसायिक भररस्त्यात दुकाने थाटत आहेत. यामुळे वाहनांना व नागरिकांना प्रवास करण्यासाठी रस्ता अरुंद राहत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आशा बेशिस्त बाजाराला शिस्त कधी आणि कोण लावणार, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
या बाजारामुळे नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत नकारात्मक भावना निर्माण होत आहे. आठवडे बाजारामध्ये जिजामाता चौक ते हिंदमाता भुयारी मार्ग या परिसरात भाजी विक्रेते तसेच इतर विक्रेते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटून बसतात.
तसेच बाजारासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यात व दुकानासमोर बेशिस्तपणे पार्क करतात. या सर्व कारणांमुळे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत असून, पादचारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.
बाजाराची सोशल मीडियावर चर्चा
तळेगाव येथे रविवारी भरत असलेल्या बाजाराची चर्चा आता सोशल मीडियावर चांगल्या गोष्टीसाठी नाही, तर येथील बेशिस्तीची होत आहे. नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर नागरिक करत आहेत. नगर परिषद व वाहतूक विभाग येथील बाजाराला शिस्त लावण्यात अपयशी ठरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बेशिस्तीचे छायाचित्र व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागास तसेच संबंधित विभागांना दर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश द्यावेत. बेशिस्तपणे रस्त्यावर व्यावसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर तसेच नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा.गणेश काकडे, उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर