अमिन खान
तळेगाव दाभाडे: पाणी, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता आणि भष्टाचार या प्रमुख मुद्द्यांवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या गेल्या पाचही निवडणुकांत सत्तापालट झाली होती. त्या वेळी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग््रेासप्रणित शहर विकास आघाडी यांच्यात सत्तेचा हा सारीपाट आळीपाळीने खेळला गेला. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (2016-17) जनसेवा विकास समितीने या दोन्ही पक्षांच्या प्रस्थापित राजकारणाला हादरवून किंग मेकर्सची दमदार सुरुवात केली होती.
आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये जनमताचा आधार होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्यांनीच तात्पुरती का होईना गट्टी केल्याने या 19/28 बिनविरोधाच्या निवडणुकीत जनाधाराचा संपूर्ण कौल नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना आयताच फाटा देण्यात आला आहे. सत्तापालट होण्यासाठी गेल्या 25 वर्षात कारणीभूत ठरलेलले नागरी समस्यांचे मुद्दे मात्र या वेळी गायब झाल्याचे चित्र आहे.
विकास आणि शांतता या दोनच शब्दांवर युतीने रचलेल्या रणनीतीभवती ही निवडणूक होत आहे. त्यांच्या समोर आव्हान उभे करील असा एकही राजकीय पक्ष तालुक्यात नाही. कारण गेल्या 25 ते 30 वर्षांत मावळ तालुक्यात काँग््रेास, शिवसेना, मनसे, आरपीआय यासारख्या पक्षातील नेत्यांनी ना कधी पक्षसंघटन केले, ना पक्षवाढीसाठी प्रयत्न. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी आणि भाजपच्या वळचणीला जाण्याचा त्यांच्या कोत्या प्रवृत्तीमुळे आज त्यांची अवस्था नीट उभे राहण्याचीही राहिली नाही.
कट्टर शत्रूवत राहिलेल्यांनी राजकीय सोयीसाठी केलेल्या युतीच्या विरोधात जनाक्रोशी झालेल्या मतदारांच्या सहानुभूतीची लाट उसळली असताना त्याचा फायदा घेण्यासाठी या पक्षांना एकही जागेवर उमेदवार देता आला नाही. ज्यांनी हे धाडस केले ते बंडखोरदेखील सेटिंगपटू ठरले. त्यांनी अर्ज मागे घेतले आणि मतदारांना गृहीत धरून युतीच्या प्रवाहात झेंडे हलवायला सामील झाले. पेटून उठलेल्या काही अपक्षांनी मात्र या निवडणुकीतील उत्सुकता टिकवून ठेवली आहे. त्यात सर्वात प्रतिष्ठेची असलेली नगराध्यक्षपदाची तिरंगी लढतच आज तालुक्यात चर्चेचा विषय आहे.
कोण जिंकणार, कोण आतून मदत करणार, कोण फुटणार, कोण किती वाटणार, अशा अनेक कयासांवर मतमतांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. रंगत टिकवून ठेवण्यात पाच प्रभागातील 9 जागांवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांचा मोठा वाटा आहे. जर त्यात ते यशस्वी झाले तर आघाडी करून विरोधी पक्ष म्हणून त्यांना सभागृहात बाकावर बसण्याची नामी संधी आहे. अन्यथा विरोधी पक्षच नसलेली तळेगाव दाभाडे नगर परिषद युतीच्या एकहाती निरंकुश सत्तेत पुढील पाच वर्षे राज्य करील. लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थानही तितकेच महत्त्वाचे समजले जाते. अर्थात 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यावरच हे सारे चित्र अधिकृतपणे स्पष्ट होईल.