तळेगाव दाभाडे: रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आठवडे बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी रात्री आठची वेळ सुनिश्चित करण्यात आली आहे. रात्री आठ वाजता बाजार बंद करण्यात यावा; अन्यथा व्यापाऱ्यांचा माल जप्त करण्यात येईल, अशा सूचना व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना तळेगाव नगर परिषदेकडून करण्यात आल्या आहे.
शहराचा ऐतिहासिक आठवडे बाजार अनेक समस्येगर्तेत सापडला आहे. गेल्या काही वर्षात बाजाराचे विस्तारलेले स्वरूप व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बाजाराच्या स्वच्छतेचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती निखिल भगत यांच्या सूचना व मार्गदर्शनाने काही नियम बनवण्यात आले आहेत.
या नियमावलीनुसार रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी रात्री आठची वेळ सुनिश्चित करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी आठच्या आधी बाजारासाठी यावे, आठनंतर त्यांना भाजीपाला व अन्य वस्तू मिळणार नाहीत याची दखल घ्यावी, असे आवाहन संतोष दाभाडे पाटील यांनी केले आहे. रविवारच्या बाजाराच्या दिवशी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, निखिल भगत, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, नगरसेवक इंदरकुमार ओसवाल, सूरज सातकर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, स्वच्छता निरीक्षक सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, पर्यवेक्षक राहुल आगळे, पुरुषोत्तम तेजी यांनी बाजारात जाऊन प्रत्येक व्यापाऱ्याला सूचना दिल्या आहेत.
कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
तळेगाव दाभाडे शहरातील आठवडे बाजार हा पंचक्रोशीतील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी तसेच ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायी असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विक्रेते व ग्राहक यांची गर्दी पाहायला मिळते; परंतु गेल्या काही वर्षात बाजाराचे वाढते स्वरूप व ग्राहकांची गर्दी यामुळे वारंवार गावभागात वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तळेगाव परिसरातील नागरिक तसेच स्थानिक व्यापारी हे या वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा या संदर्भात नगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. या सर्व मागण्यांचा विचार करून या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी व ठोस अशी उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या वतीने सांगण्यात आले.
आरोग्य केंद्राची वाट बिकट
या परिसरातच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठीसुद्धा याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यातच बाजारपेठेत राहणाऱ्या लोकांना काही वैद्यकीय गरज पडल्यास रुग्णांची ने आण याच मार्गाने करावी लागते, परंतु या कशाचीही जाणीव या बेशिस्त बाजार करणाऱ्यांना नसते. परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रार केली होती. स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्याही कानावर या समस्या घालण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनासोबत तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन, स्थानिक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वारंवार बैठका पार पडल्या होत्या. सध्या नगर परिषद प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आठवडे बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी रात्री आठची वेळ सुनिश्चित केली आहे. रात्री आठ वाजता बाजार बंद करण्यात यावा; अन्यथा व्यापाऱ्यांचा माल जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
१५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
त्याचबरोबर स्वच्छ सुंदर तळेगाव करण्यासाठी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत सुमारे १५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले आहे. आगामी काळात पुन्हा विक्रेत्यांकडे प्लास्टिक आढळल्यास प्रथम पाच हजार व पुढील वेळेस दहा हजार, पंचवीस हजार असा दंड आकारण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी बाजाराला येताना सोबत कापडी पिशव्या आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक स्वच्छता कर्मचारी आजूबाजूच्या गावातून कामासाठी तळेगाव दाभाडे शहरात ये-जा करतात. त्यांना घरी परतण्यासाठी रात्री दहाची शेवटची गाडी असल्याकारणाने बाजाराची स्वच्छता रात्री साडेनऊपर्यंत होणे अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रभागनिहाय कामे असल्याने बाजाराची स्वच्छता होत नाही. त्यामुळे रात्री अकरापर्यंत चालणारा बाजार आठ वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून आठ ते साडेनऊ या वेळात संपूर्ण बाजाराची स्वच्छता त्याच दिवशी करता येणार आहे.संतोष दाभाडे पाटील, नगराध्यक्ष