Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये श्वानांची दहशत; सात महिन्यांत १३ हजार ६१५ जणांना श्वानदंश

चिखलीत चार वर्षांच्या बालिकेवर चार-पाच श्वानांचा हल्ला; शहरात सुमारे एक लाख भटके श्वान, नसबंदीवर कोट्यवधींचा खर्च तरी संख्या नियंत्रणाबाहेर
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे, मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, यावर्षी जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ अखेरपर्यंत १३ हजार ६१५ जणांना श्वानदंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथे चार वर्षांच्या बालिकेवर चार ते पाच श्वानांनी हल्ला केला. ही घटना रविवार (दि.९) दुपारी घडली. या हल्ल्यामध्ये ही बालिका गंभीर जखमी झाल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; तसेच लहान मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडून मोकाट श्वानांची नसबंदी केली जात असतानाही श्वानांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Dog Attack
Pimpri Stray Dogs Attack: म्हेत्रे वस्तीत सात भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला; सीसीटीव्ही फुटेजने खळबळ

शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे १ लाखाच्या आसपास भटके श्वान असल्याचा पशु वैद्यकीय विभागाचा अंदाज आहे. भटक्या श्वानांची संख्या आटोक्‍यात रहावी, यासाठी श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने मादी श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. टपर्‍या, खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते, नागरिक व श्वानप्रेमींकडून तसेच, उघड्यावर व कचराकुंडीत सहजपणे खाद्य मिळत असल्याने मोकाट व भटक्या श्वानांची संख्या वाढतच आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्‍यांवर श्वान धावून जातात. श्वान अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दुचाकीस्वार वाहने जोरात पळवितात किंवा पळताना अपघात होतात. रात्रीच्या वेळी तसेच निर्जन ठिकाणी नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन जावे लागते. श्वानांच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना एकटे कुठेही पाठविण्याची पालकांना भीती वाटत आहे.

Dog Attack
Raksha Bandhan Rakhi Post Service: रक्षाबंधनासाठी पोस्टाची खास सुविधा; अवघ्या १२ रुपयांत वॉटरप्रूफ कव्हर, देश-विदेशात राखी पाठविणे सोपे

भटक्या श्वानांची महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर तक्रारींवर काहीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत श्वान पकडण्यासाठी पथक पाठविले जाते. सायंकाळनंतर श्वान त्रास देत असल्यास त्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी २०२१ - २२ दरम्यान पालिकेकडून २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्या वेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर २०२२ - २५ दरम्यान सीएसआर फंडातून निर्बिजीकरणावर खर्च करण्यात आला. त्याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही. सध्या पालिका श्वानांच्या निर्बिजीकरणावर स्वत: खर्च करत आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट आणि मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, मोकाट व भटक्या श्वानांच्या समस्येने शहरवासीय त्रस्त आहेत. कुत्र्यांकडून हल्ले व चाव्यामुळे नागरिकांचे जखमी होण्याच्या घटना वाढतच आहेत. पालिकेकडून मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. असे असले तरी, श्वानांची संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

Dog Attack
Lonavala Traffic Jam: मिसिंग लिंकनंतरही लोणावळा वाहतूककोंडीतच; ८ ते १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

शहरात अंदाजे एक लाखाच्या आसपास भटक्या श्वानंची संख्या आहे. श्वानांच्या दहशतीमुळे बालक, महिला व नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. विशेषत: लहान मुलांवर हल्ला करून त्यांचा चावे घेण्याचे प्रकार वाढले आहेत. मोकाट श्वानांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून कुत्री पकडून त्याच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी वर्षाला कोट्यवधीचा खर्च होत आहे. असे असले तरी, शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर शंका उपस्थित केली जात आहे.

सभागृहात वादळी चर्चा होऊनही परिस्थिती कायम

शहरात मोकाट श्वानांची वाढती संख्या आणि त्या श्वानांकडून होणारे नागरिक, बालक व ज्येष्ठांवरील हल्ल्यावरून 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला होता. ढीम्म अधिकार्‍यांच्या कामकाजांवर ताशेरे ओढले होते. सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडून आयुक्तांना प्रतिकात्मक कुत्र्याची बाहुली भेट देण्यात आली. त्या मुद्यावर सभागृहात चार तास चर्चा रंगली. असे होऊनही शहरातील मोकाट व भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आलेली नसल्याने नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. चर्चेनंतर महापौर रवी लांडगे यांनी शहरात आवश्यकतेनुसार भटके श्वान संगोपन केंद्र सुरू करावेत, असे आदेश आयुक्तांना दिले. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. दरम्यान, आ. महेश लांडगे यांनी मोकाट श्वानांच्या हल्ल्यांचा विषय थेट विधीमंडळ अधिवेशनात मांडला होता. बालिकेवर हल्ल्याचा प्रकार त्यांच्याच मतदारसंघात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वर्षाला दहा हजारांपेक्षा अधिक अ‍ॅन्टी रेबीजचा पुरवठा

श्वानांच्या चाव्यानंतर रेबीज हा जीवघेणा रोग होतो. त्यामुळे रुग्ण दगावू नये, म्हणून अ‍ॅन्टी रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी भांडार विभागाकडून त्या इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. जखमीना ते इंजेक्शन मोफत दिले जाते. दरवर्षी अ‍ॅटी रेबीजच्या सरासरी 10 हजारांपेक्षा अधिक औषधांच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधे असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

Dog Attack
Kasarwadi Dangerous Wall: कासारवाडीत धोकादायक भिंतीचा विळखा; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटनेची भीती

निवडणुकीतही गाजला श्वान निर्बिजीकरण मुद्दा

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद असताना महापालिकेने मोठ्या संख्येने मोकाट श्वान पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रियेच्या बोगस नोंदी करून त्या माध्यमातून लाखोंचा भ्रष्टाचार झाला. तो मुद्दा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसने या गैरव्यवहारावर बोट ठेवत भाजपवर सातत्याने आरोप केले आहेत. या प्रकरणावर तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी चौकशी समिती नेमली होती. मात्र, अद्याप निर्बिजीकरण गैरव्यवहारासंदर्भातील चौकशी अहवाल समोर आलेला नाही. त्यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगत आहे.

शहरात निर्बिजीकरण मोहिमेस गती

शहरात कुत्री जन्म नियंत्रण मोहिमेअंतर्गत निर्बिजीकरण मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत आहेत. या वाहनांद्वारे कुत्री पकडणे, नसबंदी करणे व त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते. जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करणे व नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठीही ही वाहने वापरण्यात येत आहेत. कुत्री नसबंदी शस्त्रक्रियेची संख्या वाढवण्यात येत आहे. कुत्री संगोपन केंद्र उभारण्यासाठी शहरातील काही जागांची पाहणी करण्यात आली आहे. मोकाट कुत्र्यांना कोणी अन्नपदार्थ खाऊ घालू नये, याबाबत अनेकदा आवाहनही करण्यात आले आहे, असे महापालिकेचे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

अन्नपदार्थ टाकणार्‍यांची संख्या वाढल्याने श्वानांच्या संख्येतही वाढ

चायनीज, खाद्यपदार्थ विक्रेते, मास व चिकन विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवाशी कचराकुंडी, गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. तसेच, काही प्राणिप्रेमी नागरिक दिवसातून दोन वेळा मोकाट श्वानांना खाद्य आणून टाकतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसातील ठराविक वेळेत चिकन, हाडे तसेच, भात असे पदार्थ आणून टाकले जातात. भटकी कुत्री त्या अन्नावर जगत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. श्वान एकावेळी 5 ते 10 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे श्वानांची संख्या झपाट्याने वाढते. महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात नसबंदी शस्त्रक्रिया होत नसल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नाही. मनुष्यबळाची तसेच, कुत्र्यांच्या पिंजऱ्याची संख्या कमी असल्याची कारणे महापालिकेकडून दिली जात आहेत.

महापालिकेकडून निर्बिजीकरणासाठी डॉक्टर नेमले आहेत. तसेच भटके श्वान पकडण्यासाठी मानधनावर कर्मचारी नेमले आहेत. श्वान पकडण्यासाठी चार वाहने आहेत. भटक्या श्वानांचा प्रजनन दर जास्त असल्याने श्वानाची संख्या वाढली आहे. अजून शंभर टक्के निर्बिजीकरण झालेले नाही.

डॉ. अरुण दगडे (पशू वैद्यकीय अधिकारी, पिं.चि. मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news