तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहराला पवनानदी, इंद्रायणी नदी व तळेगाव स्टेशन येथील तळ्यावरून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश निळकंठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे नागरिकांची पाण्याची मागणी वाढली आहे.
ज्या घरात इतर वेळी 500 लिटर पाण्याची मागणी असायची ती वाढून आता 800 ते 1000 लिटर झाली आहे. या वाढलेल्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करताना नगर परिषद कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. यामुळे सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी सर्वांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी पाणी जपून वापरावे, नळांना योग्य तोट्या लावून घ्याव्यात, पिण्याच्या पाण्याने वाहने धुऊ नये, पाईपलाईनमधील गळती त्वरित दुरुस्त करावी, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी केली जाते, यामुळे बऱ्याचदा वीजपुरवठा खंडित होतो. तसेच अवकाळी पावसामुळे लाईटच्या तारांवर झाडे पडून वीजपुरवठा विस्कळीत होतो.
तर काही ठिकाणी उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर जळून वीजपुरवठा खंडित होतो. या सर्वांचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा करण्याच्या सायकलमध्ये व्यत्यय आल्याने काही भागांना पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही, अशा वेळेस नागरिकांनी संयमाने नगर परिषद प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
सोमाटणे जॅकवेलच्या लाईन 40 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असल्याकारणाने बऱ्याचदा त्यामध्ये बिघाड होतो. हा बिघाड शोधून दुरुस्त करेपर्यंत काही काळ पाणीपुरवठा विस्कळीत होतो. अशा वेळेस पाणीपुरवठा कर्मचारी रात्रंदिवस काम करून बिघाड दुरुस्त करत असतात. परिणामी नागरिकांना विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागते. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद
तळेगाव दाभाडे शहराला मुंबई, पुणे व अन्य शहरातील अनेक नागरिक सेकंड होम म्हणून पसंती देत आहेत. त्यामुळे शहरात अनेक घरे ही बंद अवस्थेत आहेत. कधीतरी सुटीला येणाऱ्या या नागरिकांच्या घरांमध्ये पाण्याच्या टाक्या भरून वाहतात व या टाक्यांना स्टॉप व्हॉल्व्ह लावून घेण्याचे आवाहन आम्ही या नागरिकांना करत आहोत. आगामी काळात दोन वेळा समज देऊनही या नागरिकांकडून दुर्लक्ष झाले, तर नगरपालिका प्रशासनामार्फत त्यांच्या पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात येईल.गणेश काकडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण