तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोसायटीमध्ये फ्लॅट असणाऱ्या 4 घरमालकांवर भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाडेकरार करणे बंधनकारक
तळेगावातील इंद्रपुरी कॉलनी, हॅप्पी सिटी सोसायटी, भक्ती माधव अपार्टमेंट या सोसायटीमध्ये फ्लॅट असणाऱ्या चार घरमालकांवर भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासून त्यांची पोलिस पडताळणी करणे सर्व घरमालकांना बंधनकारक आहे.
देश विघातक कृत्य व इतर राज्यांतील गुन्ह्यांखाली फरार आरोपी आपल्या गावामध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्य करीत असू शकतात. त्यामुळे भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात त्वरित जमा करावी, असे निर्देश पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. पोलिस ठाण्याला भाडेकरूंची माहिती दिल्यास आरोपींचा शोध घेण्यास मदत होईल. भाडेकरूबरोबर भाडेकरार करणेही बंधनकारक आहे. याचा पाठपुरावा करणे ही सोसायटीच्या संचालक मंडळाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच, प्रत्येक भाडेकरूंकडून पर्यायी फोन नंबर घेण्यात यावा, जेणेकरून भविष्यात भाडेकरूंचा फोन बंद असल्यास पर्यायी नंबरवर संपर्क साधता येऊ शकतो, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
जे घरमालक भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात देणार नाहीत किंवा भाडेकरार जमा करणार नाहीत, अशा घरमालकांची नावे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यामध्ये द्यावीत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल. तळेगावातील चार घरमालकांवर गुन्हे दाखल करून कारवाईला सुरुवात झाली आहे.कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव पोलिस स्टेशन
नवलाख उंबे, आंबीतील 12 जणांवर कारवाई
घरमालकांनी आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक असतानाही अनेकांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मे महिन्यात विशेष मोहीम राबवत कारवाईचे सत्र सुरू केले असून, आतापर्यंत एकूण 12 घरमालकांवर भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक खरात, लक्ष्मण कांबळे, विवेक गोवारकर, हवालदार लाला हेमाडे, पोलिस अंमलदार विनोद पाटुळे, पोपट हुलगे, रोशन पगारे यांनी केली.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवलाख उंबे, बधलवाडी, आंबी, वारंगवाडी आदी गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी परिसरात तपासणी मोहीम राबवत भाडेकरूंची नोंद, ओळखपत्रे तसेच संबंधित माहितीची पडताळणी केली. अनेक घरमालकांनी भाडेकरूंबाबतची आवश्यक माहिती पोलिस प्रशासनाला न दिल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत
भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात उपलब्ध असल्यास गुन्हे प्रतिबंध, संशयित व्यक्तींची ओळख तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होते. काही वेळा गुन्हेगार खोटी माहिती देऊन भाड्याने राहत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. सध्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांची ही मोहीम सुरू केली असून, आगामी काळात आणखी तपासणी व कारवाया वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आपल्या घरात राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची संपूर्ण माहिती, ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे पोलिस ठाण्यात तातडीने जमा करावीत; अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे