तळेगाव स्टेशन : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, या अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. नगराध्यक्ष जनतेमधून निवडून येणार असून, नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, अद्याप कोणाचीच उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुक संभमात आहेत. प्रचार सुरू करावा तर खर्च होत आहे आणि नाही करावा तर ऐनवेळी उमेदवारी मिळाली तर कसा निभाव लागणार म्हणजे इच्छुकांची अवस्था धरले तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय, अशी भावना निर्माण झाली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
तळेगाव नगर परिषदेमध्ये एकूण 14 प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे 28 नगरसेवक निवडून येणार आहेत. नंतर 3 नियुक्त करण्यात येणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरीसुद्धा कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी अद्याप जाहीर न केल्यामुळे उमेदवारांचे चित्र स्पष्ट झालेले नाही. यामुळे इच्छुक संभमात असून, धड प्रचार करता येईना आणि गप्प बसता येईना, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. प्रचार करावा, खर्च करावा तर ऐनवेळी उमेदवारी मिळाली नाही तर खर्च आणि वेळ वाया जाईल. प्रचार नाही करावा तर ऐनवेळी उमेदवारी मिळाली तर धावपळ होईल. तसेच कोणाकडून उमेदवारी मिळेल हे अनिश्चित असल्यामुळे अनेकजण मोघम प्रचार करीत आहेत. काय काम केले काय करणार हे जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मतदारांत मात्र कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. ओट्यावर, कट्टयावर चौकाचौकांत गप्पा रंगत आहेत. आपला अंदाज छातीठोकपणे सांगत आहे. अनेक इच्छुकांची अवस्था तळ्यातही नाही आणि मळ्यातही नाही अशी झालेली आहे. अनेकजण नेते मंडळींचे आणि मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी देवदर्शन घडवित आहेत. पैठणीच्या खेळाचे आयोजन करीत आहेत. वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनामार्फत संवाद साधण्याचे, खेळांच्या स्पर्धांचे,आयोजन करीत आहेत. काही जण उमेदवारी दाखल करायची आणि काहीतरी अश्वासन घेऊन उमेदवारी मागे घ्यायच्या तयारीत आहेत. काहीजण अपक्ष लढून बंडखोरीच्या तयारीत आहेत. इच्छुकांमध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.
अनेकजण इच्छुक असल्यामुळे कोणाला तिकीट द्यावयाचे कोणाला नाही या संभमात नेते मंडळी आहे. कोणाला जरी तिकीट दिले तरी कोण ना कोण नाराज होईलच त्यांची नाराजी कशी दूर करावयाची, याबाबत प्रश्न सर्वांनाच आहे. यामुळे उमेदवाराची नावे जाहीर करण्यास वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या सभेत आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना म्हणाले की मी सहकार्यासाठी एकहात पुढे करतो यावर बाळा भेगडे म्हणाले की, सुनील शेळके यांनी एकहात पुढे केला तर मी दोन हात पुढे करणार असून, मावळातील सर्व निवडणुका बिनविरोध करू. यानुसार, या दोघांचे एकमत झाले असून महायुतीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सोमवारी (दि.10) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.