तळेगाव स्टेशन: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी सुरू असलेल्या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. 6 शाळेला मंजूर झालेली एआय लॅब (कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा) सज्ज झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एआय स्किल्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी दिली.
शासनाने निश्चित केलेल्या राज्यातील तीन शाळांपैकी शालेय शिक्षण विभाग आणि एचपी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर या शाळेचा समावेश असून, राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
मुख्याध्यापक संजय चांदे, शिक्षक डॉ. संतोष शिंदे, अनिल गाभणे, लहू पिंपळे, जालिंदर पाचपुते, संतोष बच्चे, हर्षाली शेलार आणि सविता खेंगरे यांच्या उपस्थितीत मानोशी डे, डॉ. ऋतूपर्णा मटकर, नवीन चावला आदी एआय तज्ज्ञांमार्फत या प्रयोगशाळेतील प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली.
एचपी इंडिया कंपनीने संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांचे तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करणार असल्याचे मुख्याध्यापक संजय चांदे यांनी सांगितले. वायफाय जोडणीसह 25 संगणक, डिजिटल बोर्ड आणि टीचर्स पोडीयमसह ही वातानुकूलित प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. येत्या 15 जूनपासून ती कार्यरत होईल.
न.प. कडून उपक्रमाचे स्वागत
नगर परिषद शिक्षण समितीच्या सभापती भारती धोत्रे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार असून, ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे मिळणार असल्याचे मत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी व्यक्त केले. शिक्षकांनीही या संधीचे स्वागत करत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शाळांमधील परिस्थिती प्रगतिपथावर आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. समर्पित शिक्षकवृंद, विविध संस्थांच्या माध्यमातून वर्षभर राबविले जाणारे व्यक्तिमत्त्व विकासाधरित उपक्रम, क्रीडा आणि इतर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर मिळविलेले यश पाहाता पालक व नागरिकांनी देखील सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे