

लोणावळा: नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम परिसर) येथे उघडकीस आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४२ वर्षीय पित्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये ही घटना घडली. आरोपी शिवाजी आसाराम चव्हाण (वय ४२, मूळ रा. बोरखेडी, जि. हिंगोली) हा सध्या मावळमधील जवन (पवना डॅमजवळ) येथे वास्तव्यास आहे. फिर्यादी पीडित मुलगी अल्पवयीन असताना, आरोपीने तिच्या हतबलतेचा फायदा घेत तिला जबरदस्तीने खाली पाडून तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना एकदा नव्हे तर तीन ते चार वेळा घडली. नराधम पित्याने पीडितेवर अत्याचार केल्यानंतर जर ही बाब कोणाला सांगितली तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. पित्याच्या या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. भीतीपोटी ती आजवर गप्प राहिली आणि मुंबईत काम करून वडिलांना पैसेही पाठवत राहिली.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मावशीकडे राहण्यास गेली. तेथे गेल्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळातून मुक्त होण्यासाठी तिने अखेर धाडस करून पोलिसांत तक्रार देण्याचे ठरवले. ही तक्रार सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयात देण्यात आली होती, जिथून ती शून्य (Zero FIR) क्रमांकाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिवाजी चव्हाण याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(f), ६४(२)(m) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या घटनेचा तपास करत आहेत. नसरापूर येथील घटना ताजी असताना मावळातील ही घटना समोर आल्याने, या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली असून नराधम पित्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.