Crime Against Women Pudhari
पिंपरी चिंचवड

Tadipar Accused Assault Case: तडीपार गुंडाकडून महिलेवर बलात्कार; पोलिस अंमलदार निलंबित

तडीपारी आदेशाचे उल्लंघन उघड; निगराणीतील हलगर्जीपणावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करत एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात तडीपार आरोपीवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

फारुख सत्तार शेख (25, रा. बालाजीनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला 8 एप्रिल 2024 रोजी पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तो एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर झोपडपट्टीत वास्तव्यास होता. सध्या तो आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी फाटा परिसरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तडीपार आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी ‌’दत्तक योजना‌’ राबवली जाते. त्यानुसार आरोपी फारुख शेख याची जबाबदारी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार भागवत शेप यांच्याकडे देण्यात आली होती. संबंधित अंमलदारावर आरोपीचे लोकेशन तपासणे व तडीपारी आदेशाचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी होती. तपासात असे आढळून आले की, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करत होता.

18 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्याने एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने सहा दिवसांनंतर आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच तडीपार आरोपीवर आवश्यक ती निगराणी न ठेवल्याबद्दल पोलिस अंमलदार भागवत शेप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत 307 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. याच कालावधीत तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश केलेल्या 459 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT