Sushma Andhare Pudhari
पिंपरी चिंचवड

Dowry Death Case: हुंडाबळी, महिला अत्याचार थांबणार कधी?; दोषींना कठोर शिक्षा द्या: सुषमा अंधारे

कुटुंबीयांची भेट घेत व्यक्त केली संवेदना; राजकीय पार्श्वभूमी असली तरी गुन्हेगारांना पाठीशी घालू नका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही राज्यात हुंडाबळी आणि विवाहित महिलांच्या छळाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. नुकत्याच घडलेल्या शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजमन हादरले आहे. मुलीचे लग्न करताना पालकांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे अशा घटनांतील दोषींना कोणतीही सवलत न देता कठोर शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगारांना पाठीशी घातल्यास त्याचे सामाजिक मूल्यांकन समाजच करत असतो, असा इशाराही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

अंधारे यांनी शिल्पा यांच्या माहेरच्या कलाटे कुटुंबीयांची वाकड येथील निवासस्थानी शनिवार (दि. २९) सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हुंडाबळी, महिला अत्याचार तसेच आरोपींना मिळणाऱ्या जामिनाच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तरी लोक आपल्या सुनांना सांभाळतील, त्यांचे लाड करतील, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा वैष्णवीसारखीच शिल्पा गवारे यांची घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. कोणत्याही मुलीचे लग्न करताना तिच्या कुटुंबीयांच्या मनात हजार वेळा शंका निर्माण होतात. त्यामुळे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे.

राजकीय पार्श्वभूमी असली तरी माणसे मारण्याचा परवाना आहे का ?

आरोपींची राजकीय पार्श्वभूमी असली तरी त्यांना माणसे मारण्याचा परवाना मिळतो का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. कोणत्याही पक्षातील व्यक्ती असो, अशा घटनांकडे पक्षाच्या चष्म्यातून न पाहता 'कोणाची तरी बहीण, लेक' म्हणून पाहिले पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घातल्यास त्याचे सामाजिक मूल्यांकन समाजच करत असतो, असा इशाराही त्यांनी दिला.

शिल्पाच्या नावाने पुन्हा अन्याय नको

कलाटेंची कन्या म्हणून सोबत शिल्पा गवारे असे नाव लावून पुन्हा तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा, तिचा जीव घेणाऱ्या लोकांच्या नावाने तिला ओळखण्यापेक्षा आम्ही तिला 'कलाटेंची कन्या' म्हणूनच पाहणार आहोत आणि तिच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे राहणार आहोत, असे अंधारे यांनी सांगितले.

शिवसेना अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहणार

शिवसेनेची भूमिका कायम अन्यायाविरोधात राहणार आहे. आम्ही गुन्हेगारी जगताच्या विरोधात ठामपणे उभे राहू. वैष्णवी हगवणे प्रकरणात जी ठाम भूमिका घेतली होती, तशीच भूमिका शिल्पा गवारे यांच्या प्रकरणातही घेणार आहोत, असे अंधारे यांनी स्पष्ट केले. घटना घडल्यानंतर आरोपी जामिनावर सुटतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. न्यायव्यवस्थेने अशा प्रकरणांकडे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रूपाली चाकणकरांच्या हॉटेल व्यवसायावर अंधारेंचा खोचक टोला

दरम्यान, माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नव्या हॉटेल व्यवसायाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे यांनी खोचक टिप्पणी केली. कीर्तन सांगणाऱ्या माणसाने मटणाचे दुकान टाकायचं नसते, असे त्या म्हणाल्या. तसेच, आयोगाची महिला जर बारची मालकीण होत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला लगावत त्यांनी चाकणकरांच्या नव्या व्यवसायावर निशाणा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT