Supriya Sule Pudhari
पिंपरी चिंचवड

Supriya Sule: पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष संघटन मजबूत करा; सुप्रिया सुळे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी द्या, असे मार्गदर्शन पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना केले. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहरात झालेल्या बैठकीस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, विशाल वाकडकर, माजी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, जयंत शिंदे, देवेंद्र तायडे, माजी महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, सुलक्षणा धर, संदीप चव्हाण, योगेश सोनवणे, काशिनाथ जगताप, रजनीकांत गायकवाड, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. सुळे यांनी पदाधिकार्‍यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पदाधिकार्‍यांच्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या साठी जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेले वेगवेगळे मुद्दे, अडचणी व समस्यांचे त्यांनी निरसन केले.

चाकण, हिंजवडी, नाशिक यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळली गेल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी वर्गामध्येही नाराजी असल्याचे सांगत राज्यात विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने सुरू असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात 200 आमदारांचे सरकार असूनही विरोध व आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे त्या म्हणाल्या.

हिंजवडीच्या महापालिकेत समावेशाचा निर्णय स्थानिकांशी चर्चा करून घ्यावा

हिंजवडी आयटी पार्कसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका करत हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र सरकारने चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा. मात्र, निर्णय काहीही असो, हिंजवडीसह महाराष्ट्रातील नागरिकांना रस्ते, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या मंगळवारी खा. सुळे शहरात

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे या पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. त्यातील पहिल्या मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्या जनता दरबार घेणार आहेत. शेवटचा मंगळवार हा पक्ष संघटनेसाठी असणार आहे. तर, माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांचे पिंपरी येथील संपर्क कार्यालयातून आता पक्ष कार्यालयाचे कामकाज केले जाणार आहे, असे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

हिंजवडीबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप

हिंजवडी आयटी पार्कमुळे मोठी गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंजवडी आयटी पार्क गुंतवणुकीच्या स्वरूपात आणले होते. मात्र, ही गुंतवणूक उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हिंजवडीच्या प्रश्नांचा आपण दरमहा सातत्याने आढावा घेत असल्याचे सांगत सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT