Sunil Shelke Pudhari
पिंपरी चिंचवड

Sunil Shelke Political Controversy: मावळमध्ये राजकीय खळबळ; रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया

आमदार रोहित पवारांनी सुनील शेळके भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. त्यावर शेळके यांनी प्रत्युत्तर देत आरोप फेटाळले असून मावळमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते व आमदारही भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांचाही समावेश असल्याचा उल्लेख आमदार रोहित पवार यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः मावळ तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, म्हणून आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार शेळके यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे काही नेते व त्यांच्यासोबत काही आमदार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला असून, मावळचे आमदार सुनील शेळके हेही भाजपमध्येच जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून, यामध्ये आमदार शेळके यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने मावळ तालुक्यातही चर्चेला उधाण आले आहे. आमदार शेळके हे सन 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यात आता रोहित पवारांनी हाच दावा केल्याने या चर्चांना अधिक रंग चढला आहे.

आमदार शेळके यांनी रोहित पवारांनी केलेला दावा फेटाळून लावत अजितदादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. तसेच, काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत रोहित पवारांनी भविष्यवाणीचा नवीन धंदाच सुरू केला आहे का, असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी रोहित पवारांचा प्रयत्न?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये, यासाठी रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप आमदार शेळके यांनी या वेळी केला. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा यासाठी रोहित पवारांनी हट्ट धरला होता. तसेच, 2029 मध्ये ते स्वतः काँग्रेसकडून बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही आमदार शेळके यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. तसेच, आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लागत असताना आम्ही दुसरा पर्याय का शोधू?
सुनील शेळके, आमदार मावळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT