पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर अस्वच्छ व विद्रुप करणार्या 7 हजार 214 नागरिक व व्यावसायिक आस्थापना चालकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी गेल्या वर्षभरात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 85 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका वर्षात दंडाची सर्वाधिक मोठी कारवाई केल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिका सहभागी झाली आहे. शहर स्वच्छतेबाबत इंदूर पॅटर्न राबविला जात आहे. त्यासाठी कचरा कुंडीमुक्त शहर संकल्पना राबविली आहे. अठरा मीटर व त्या पुढील रस्त्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने केली जाते. (Latest Pimpri News)
घरोघरचा कचरा संकलनाचे काम दोन ठेकेदारांमार्फत सुरू आहे. ओला, सुका, प्लास्टिक, घातक, बायोवेस्ट अशा पाच प्रकारे वर्गीकरण केलेला कचरा स्वीकारला जात आहे. जनजागृतीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. शिवाय कचरा स्थलांतरणासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केंद्र सुरू केले आहेत.
शहरातील काही बेशिस्त नागरिक रस्त्यावर व मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका व शौच करणे, राडारोडा व कचरा टाकणे, कचरा रस्त्यावर जाळणे, डास उत्पती ठिकाणांकडे दुर्लक्ष करणे, कचर्याचे वर्गीकरण न करणे, जाहिरातींची पोस्टर लावणे, बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकणे, बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणे यासह विविध प्रकारे शहर विद्रूप करणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून शहर अस्वच्छ करणार्यांवर दंड केला जातो.
एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षाच्या कालावधीत शहर विद्रूप करणार्या 7 हजार 214 व्यक्ती आणि व्यावसायिक आस्थापना चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 85 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरभरात दंडात्मक कारवाई केली जात असतानाही बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा फेकून अस्वच्छता निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. त्याला कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी होत आहे.
स्वच्छ भारत अभियानात यंदा सुधारणा की घसरण?
शहर स्वच्छता आणि जनजागृतीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात महापालिका दरवर्षी सहभाग घेते. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा देशात 13 वा आणि राज्यात तिसरा क्रमांक आला होता. त्यामुळे यंदा यामध्ये सुधारणा की घसरण होणार, 17 जुलैला जाहीर होणार्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
...अन्यथा कारवाई
नागरिकांनी उघड्यावर कचरा, राडारोडा टाकू नये. लघुशंका करू नये. घरोघरचा कचरा वर्गीकरण करून जमा केला जात आहे. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून शहर विद्रूप करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.