

सोमाटणे: मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. दारुंबरे गावात आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. सध्या सुरू असलेला पाऊस भातपिकासाठी पोषक असल्याने शेतकर्यांनी भातलागवड सुरू केल्या आहेत. परिसरात चारसूत्री पद्धतीने भातलागवड केली जात आहे.
उत्पादनात होणार वाढ
दारुंबरे गावातील शेतात चारसूत्री पद्धतीने भातलागवड सहायक कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. मावळात सध्या चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकर्यांनी दोरीच्या साह्याने 25 बाय 25 सेंमी अंतरावर दोरी तयार करून चारसूत्री पद्धतीने भात लागवड सुरू केल्या आहेत.
लागवडीनंतर युरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चुडाच्यामध्ये एक गोळी अशा प्रकारे लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांत लावणार असल्याचे शेतकर्र्यांनी सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
मजुराचा तुटवडा
या वर्षीही मजुराचा तुटवडा जाणवत आहे. सध्या शेतकरी एकमेकांच्या मदतीने भात लागवड करत आहेत. पावसामुळे नेहमीच होणार्या नुकसानीमुळे शेतकरी आधुनिक लागवडीकडे वळले आहेत. या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसूत्री पध्दतीने लागवड करताना दिसत आहेत. शेतकरी भातलावणी करताना दोन ते तीनच भातरोपे लावत आहेत.
कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. साळुंबरे, गोडुंबरे, शिरगाव, सांगवंडे, गोडुंबरे, गहुंजे, दारुंबरे परिसरातील 200 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करणार असल्याचे सहायक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.
चारसूत्री पद्धतीने लागवड करताना भातरोपे कमी लागत आहे. तसेच, भातलावणीस कमी वेळ लागतो व बियाणे कमी लागल्यामुळे खर्च ही कमी येतो. युरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 2 ते 3 पट वाढ होणार असून, कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकर्याना निश्चितच फायदा होत आहे.
- रामदास सोरटे, प्रगतिशील शेतकरी, दारुबरे
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकर्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, भात चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे हे कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात चारसूत्री पद्धतीने भातलागवड करण्यात येत असून, यामुळे उत्पादन वाढणार आहे. तसेच, खर्चही कमी होणार आहे.
- विकास गोसावी, सहायक कृषी अधिकारी, सोमाटणे